कर्करोगाशी झुंज देत संसदेतील दमदार उपस्थिती; स्मिताताई वाघ यांना पुन्हा ‘संसद रत्न’ सन्मान
1 min read

कर्करोगाशी झुंज देत संसदेतील दमदार उपस्थिती; स्मिताताई वाघ यांना पुन्हा ‘संसद रत्न’ सन्मान

Loading

कर्करोगाशी झुंज देत संसदेतील दमदार उपस्थिती; स्मिताताई वाघ यांना पुन्हा ‘संसद रत्न’ सन्मान

अमळनेर प्रतिनिधी :
देशातील संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, हा मानाचा पुरस्कार त्यांना पुनश्च दुसऱ्यांदा प्राप्त झाला असून जळगाव जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियंदर्शिनी राहुल यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंतच्या संसदेतील कामगिरीचा सखोल आढावा घेऊन ज्युरी समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

संसदीय कामकाजातील सक्रिय सहभाग, चर्चांमधील प्रभावी मांडणी, लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि शिस्तबद्ध उपस्थिती यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संसदेमध्ये अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भूमिका मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींना या निकषांवर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळाले असून राज्यातील पाच खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे , नरेश म्हस्के , हेमंत सावरा , स्मिता वाघ तसेच राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.

खासदार स्मिताताई वाघ यांच्या कार्यनिष्ठेचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. सध्या त्या कर्करोगाशी झुंज देत असतानाही त्यांनी संसदेतील कामकाजात सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे. केमोथेरपीचे उपचार सुरू असतानाही संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहून त्यांनी जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या जिद्दीचा, कर्तव्यभावनेचा आणि लोकसेवेप्रती असलेल्या समर्पणाचा गौरव म्हणून हा पुरस्कार अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. सलग दुसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्या संसदीय कार्याची देशपातळीवर दखल घेतली जात असल्याचे मानले जात आहे. जळगाव जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून विविध स्तरांतून खासदार स्मिताताई वाघ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *