शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मोठा निर्णय ,कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या पुढाकाराने कोल्हापूर विभागात आढावा बैठक; अनेक शिक्षकांच्या समस्या मार्गी
![]()
शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर मोठा निर्णय
कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या पुढाकाराने कोल्हापूर विभागात आढावा बैठक; अनेक शिक्षकांच्या समस्या मार्गी
कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर विभागातील तसेच कोकण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी आज शुक्रवार दि. २२ मे २०२६ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. ही बैठक कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या अध्यक्षतेखाली तर शिक्षक आमदार मा. जयंत आसगावकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीस शिक्षण उपसंचालक मा. प्रभावती कोळेकर मॅडम, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण विभागात प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांचा मुद्देसूद आढावा शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी घेतला. कार्यालयीन दिरंगाईमुळे शिक्षकांची कामे रखडत असल्याची बाब त्यांनी बैठकीत ठामपणे मांडली.
बैठकीत वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी, थकीत वेतन, फरक बिले, रोस्टर तपासणी, शिक्षकेतर कर्मचारी मान्यता, प्रथम मान्यता, मंडळ मान्यता प्रस्ताव आदी विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
- श्री शामसुंदर रघुनाथ पाटकर (सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल, ता. राजापूर) यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता.
- श्रीमती रूपाली निरंजन देशमुख (न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय, लांजा) यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता.
- श्री महेश रामचंद्र जाधव (न्यू इंग्लिश School व कनिष्ठ महाविद्यालय, लांजा) यांची वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता.
- श्री सुनील अंकुश गोसावी (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी) यांना उपप्राचार्य पद मान्यता.
- श्री विद्याधर त्रिंबक केळकर यांना पर्यवेक्षक पद मान्यता.
बैठकीदरम्यान जवळपास १८० वैयक्तिक समस्या शिक्षण उपसंचालक मा. कोळेकर मॅडम यांच्याकडे सादर करण्यात आल्या. यातील काही प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे, तर उर्वरित प्रश्न पुढील पंधरा दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे सर, घुगरे सर, सुनील भाऊ जगताप, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे सर, सचिव कुसगावकर सर, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर सर, तोफिक सर, मिश्रा सर, शिक्षक परिषदचे भरत केसरकर सर, घावरे सर, बाबा पाटील, दत्ता पाटील, एम. आर. पाटील, संतोष नाईक, अरविंद सावंत, मुस्ताक पटेल यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रश्नांबाबत प्रशासन सकारात्मक भूमिका घेत असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

