जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे पोलीस भरतीत घवघवीत यश, हेमंत काटे व कल्पेश पाटील यांचा पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे सत्कार
![]()
जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनामुळे पोलीस भरतीत घवघवीत यश
हेमंत काटे व कल्पेश पाटील यांचा पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या दोन विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
यामध्ये हेमंत रामकृष्ण काटे यांची धुळे एसआरपीएफ पोलीस पदी तर कल्पेश संजय पाटील यांची ठाणे शहर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल मार्गदर्शन केंद्रातर्फे त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे संचालक श्री ईश्वर महाजन उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाडसे माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक श्री किशोर पाटील यांची उपस्थिती लाभली. तसेच यशस्वी उमेदवार हेमंत काटे यांचे वडील श्री रामकृष्ण काटे व आई सौ. सुनीताताई काटे हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी जिद्द व क्षमता असून योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश संपादन करता येते. आजच्या स्पर्धेच्या युगात मेहनत, संयम आणि योग्य नियोजन यांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास करावा, असे आवाहनही करण्यात आले.
हेमंत रामकृष्ण काटे हे कोळपिंप्री ता. पारोळा येथील रहिवासी असून त्यांचे वडील शेती व्यवसाय करतात तर आई गृहिणी आहेत. अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून सातत्याने परिश्रम घेत त्यांनी हे यश मिळविले आहे.
तर कल्पेश संजय पाटील हा नंदगाव ता. अमळनेर येथील रहिवासी असून त्याचे आई-वडील शेतकरी आहेत. कठोर मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर त्यानेही पोलीस भरतीत यश संपादन केले.
तालुक्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत एकूण २० टेस्ट घेण्यात आल्या होत्या.
या टेस्ट सिरीजमुळे लेखी परीक्षेची उत्तम तयारी होऊन आत्मविश्वास वाढल्याचे मत यशस्वी उमेदवार हेमंत काटे आणि कल्पेश पाटील यांनी व्यक्त केले.
या दोघांच्या यशाबद्दल आदिवासी विकास विभाग नाशिकचे सहआयुक्त श्री कपिल पवार सर, राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी पुणेचे संस्थापक अध्यक्ष श्री नितीन अहिरराव सर, मार्गदर्शन केंद्राला सहकार्य करणारे सर्व सन्माननीय अधिकारी, तज्ञ मार्गदर्शक तसेच पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संपूर्ण संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्र संचालक विजयसिंग पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. प्रिया परदेशी यांनी मानले.


