शिक्षणाधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाहीत स्वतः दिलेला शब्द फिरवला, आठ हजार शिक्षकांचे वेतन रखडले — आंदोलनाचा इशारा”
![]()
“शिक्षणाधिकारी कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाहीत स्वतः दिलेला शब्द फिरवला, आठ हजार शिक्षकांचे वेतन रखडले — आंदोलनाचा इशारा”
जळगाव प्रतिनिधी: “दोन दिवसांत वेतनाचा मार्ग मोकळा करू”, “सर्व शाळांचे वेतन एकाच लॉटमध्ये देऊ” अशी मोठी आश्वासने देणाऱ्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना आता स्वतःच्या शब्दांचा विसर पडल्याचा आरोप माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने केला आहे. जिल्ह्यातील सुमारे आठ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनाविना आर्थिक संकटात सापडले असून शिक्षण विभागाच्या दिरंगाईविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित तसेच अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांचे मार्च व एप्रिल २०२६ चे वेतन अद्याप रखडलेले आहे. शालार्थ प्रणालीतील तांत्रिक कारणे पुढे करून केवळ वेतन बिले “कन्सोलिडेट” करून ठेवण्यात आली असून प्रत्यक्षात पगार न करता शिक्षकांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप समन्वय समितीने केला आहे.
विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने २२ एप्रिल व ६ मे २०२६ रोजी दिलेल्या स्पष्ट निर्देशांमध्ये कोणत्याही शिक्षकांचे वेतन थांबवू नये, असे आदेश दिलेले असतानाही राज्य शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून अद्याप पत्र जारी करण्यात आलेले नाही. न्यायालयाच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवण्याचे शिक्षणाधिकारी, शिक्षण आयुक्त कार्यालय करत असल्याचा संतप्त आरोप संघटनांनी केला आहे.
समन्वय समितीच्या व समता शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निवेदने देऊन, तसेच शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी थेट संपर्क साधूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. “आयुक्तांचे पत्र मिळाल्याशिवाय वेतन बिलावर सही करता येणार नाही,” अशी भूमिका जळगाव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांनी “पुढील दोन दिवसांत सर्व त्रुटी दूर करून वेतनाचा मार्ग मोकळा करण्यात येईल,” असे आश्वासन दिले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांचे वेतन एकाच लॉटमध्ये करण्यास मान्यता दिल्याचेही जाहीर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विमा, पतसंस्था, बँक कर्जाचे हप्ते, घरभाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि दैनंदिन उदरनिर्वाह यामुळे शिक्षक आर्थिक व मानसिक तणावाखाली गेले असून प्रशासन मात्र केवळ पत्रव्यवहाराच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.गेल्या काही दिवसापासून समन्वय समितीच्या व समता शिक्षक परिषदेचे अध्यक्ष भरत आप्पा शिरसाट तसेच समन्वयक तुळशीराम सोनवणे, डॉ मिलिंद बागुल यांनी व पदाधिकाऱ्यांनी सतत शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न कायदेशीर रित्या लावून धरलेला आहे
येत्या दोन दिवसांत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे वेतन तात्काळ अदा न झाल्यास राज्य शिक्षण आयुक्त व जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात जळगाव येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा आक्रमक इशारा समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरतजी शिरसाट तसेच माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या वतीने अध्यक्ष गिरीश नेमाडे, कार्याध्यक्ष पी.ए पाटील, समन्वयक तथा संचालक तुळशीराम सोनवणे समितीचे मार्गदर्शक पी. एस. सोनवणे, प्र.ह दलाल, समाधान महाजन, शुद्धोधन सोनवणे,डॉ.मिलिंद बागुल, उपाध्यक्ष गोविंदा पाटील बोदवड, सुरेश अहिरे ,दिनेश पाटील जामनेर, सुनील वानखेडे, देवेंद्र तायडे, पी बी नरवाडे, महिला पदाधिकारी सुनीता खडके सुनीता पाटील, समता शिक्षक परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीत सोनवणे, कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब सोनवणे, रवींद्र सोनवणे तसेच समन्वय समितीचे कार्यकारी सदस्य संतोष कचरे, डॉ बी.डी. शिरसाट (धरणगाव), आर के पाटील जळगाव, प्रवीण धनगर संजय पाटील (भडगाव), विनोद महेश्री, विकास चौधरी (मुक्ताईनगर),किरण पाटील (चोपडा), प्रदीप सोनवणे (दिपनगर), विनोद पाटील (पारोळा) ,अमोल वाणी (एरंडोल), अनिल मनोरे (धरणगाव आर एल बाविस्कर चोपडा यांनी दिला आहे आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असल्याने शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.
चौकट
“जिल्हास्तरापासून राज्य पातळीपर्यंत शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांकडून शिक्षकांच्या वेदनांकडे होत असलेले दुर्लक्ष अत्यंत दुर्दैवी आहे. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही हजारो शिक्षकांचे वेतन रोखले जात आहे, ही शिक्षण व्यवस्थेसाठी निंदनीय बाब आहे.”
— तुळशीराम तोताराम सोनवणे
समन्वयक, माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा

