कुरवेल येथे जनजागृतीद्वारे जागतिक डेंग्यू दिन साजरा ,डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
![]()
कुरवेल येथे जनजागृतीद्वारे जागतिक डेंग्यू दिन उत्साहात साजरा
डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधासाठी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
अमळनेर प्रतिनिधी —
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १६ मे २०२६ रोजी जागतिक डेंग्यू दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी अंतर्गत उपकेंद्र कुरवेल येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालय चौकात आयोजित या कार्यक्रमात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया तसेच व्हायरल फिव्हर यांसारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली. आजारांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि स्वच्छतेचे महत्त्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर व तालुका आरोग्य सहाय्यक विजय देशमुख यांनी ग्रामस्थांना समुपदेशन करताना सांगितले की,
व्हायरल फिव्हरमध्ये अचानक ताप, अंगदुखी, डोकेदुखी व थकवा जाणवतो. अशावेळी पुरेशी विश्रांती घेणे, भरपूर पाणी पिणे आणि तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
डेंग्यू हा एडीस डासांमुळे होणारा आजार असून हे डास प्रामुख्याने सकाळी व संध्याकाळी चावतात. त्यामुळे घराभोवती पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, मच्छरदाणीचा वापर करणे व परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
मलेरिया हा अनोफिलीस डासांमुळे होतो. तापासोबत थंडी व घाम येणे ही त्याची प्रमुख लक्षणे असून वेळेत उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांना आठवड्यातून एकदा घर व परिसरातील पाणी साचलेली ठिकाणे तपासण्याचे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच “माझे गाव – आरोग्यसंपन्न गाव” ही सामूहिक शपथ घेऊन ग्रामस्थांनी डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधाचे संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी आरोग्य पथकाकडून जनजागृतीपर कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. संशयित ताप रुग्णांचे रक्त नमुने घेऊन आवश्यक किरकोळ उपचारही करण्यात आले.
प्रसंगी आरोग्य सेवक अरविंद पाटील, आरोग्य सेविका छाया धनगर, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

