खरीप हंगाम तोंडावर तरी ‘एटीएम’मध्ये पैशांचा खडखडाट; शेतकरी हवालदिल, किसान काँग्रेसचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अग्रणी बँक व्यवस्थापकांना तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश
![]()
खरीप हंगाम तोंडावर तरी ‘एटीएम’मध्ये पैशांचा खडखडाट; शेतकरी हवालदिल
किसान काँग्रेसचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अग्रणी बँक व्यवस्थापकांना तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश
खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना आणि शेतीची कामे सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील बहुतांश एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. हातात पीक कर्जाचे पैसे नसल्याने खते, बियाणे खरेदी रखडली आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जळगाव जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि. १५ जून) निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
मार्चअखेर पोटाला चिमटा काढून कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २० एप्रिलनंतर कृषी एटीएम कार्डमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून शेतकरी पैसे काढण्यासाठी एटीएमच्या रोज चकरा मारत आहेत. बहुतांश एटीएममध्ये पैसेच उपलब्ध नसतात, तर काही ठिकाणी कृषी कार्ड चालत नाही. खते, बियाणे खरेदी आणि उसनवारी फेडण्यासाठी पैशांची अत्यंत आवश्यकता असताना हाती रोकड पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ज्या अशिक्षित शेतकऱ्यांना एटीएम हाताळता येत नाही, त्यांना सोबत भाड्याने माणूस आणावा लागत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची तत्काळ दखल
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे यांना तत्काळ फोन करून या प्रश्नावर तातडीने मार्ग काढण्याचे आदेश दिले.
अग्रणी बँकेचे आश्वासन
प्रशासकीय भेटीनंतर किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अग्रणी बँक (सेंट्रल बँक) व्यवस्थापकांचीही भेट घेतली आणि त्यांना लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या हालाची प्रत्यक्ष कल्पना दिली. यापूर्वीही या प्रश्नावर फोनवरून चर्चा करण्यात आली होती. बँक प्रशासनाने शिष्टमंडळाला सांगितले की, “आम्ही या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या (RBI) संपर्कात असून, पुरेशा कॅशची मागणी नोंदवली आहे. लवकरच यावर मार्ग काढला जाईल,” असे आश्वासन दिले.
जिल्हा बँकेमार्फत किमान निम्मे कर्ज तरी रोखीने देण्यात यावे, अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. हे निवेदन जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष सुकलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी दिनेश पवार (तालुका अध्यक्ष) यांच्यासह अन्य पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.


