पाण्याचे राजकारण थांबवा; जनतेची सेवा करा” , २४x७ पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर सुरू असल्याची सभापती कैलास पाटील यांची ग्वाही
![]()
“पाण्याचे राजकारण थांबवा; जनतेची सेवा करा”
२४x७ पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर सुरू असल्याची सभापती कैलास पाटील यांची ग्वाही
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहरातील पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदारांवर गंभीर आरोप करत जोरदार पलटवार केला आहे. “अमळनेरच्या जनतेची दिशाभूल करून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे राजकारण स्वतः आमदार साहेबच करीत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, जळोदच्या दिशेने येणारे पाणी अडविण्यामागे आमदारांचेच हितसंबंध कारणीभूत आहेत. तापी नदीवरील पाच वाळू ठेक्यांमुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे करण्यात आले असून, वाळू उपसा व वाहतुकीसाठी ठिकठिकाणी रस्ते आणि बांध घालण्यात आले. त्यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह अडला आणि अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला, असा आरोप करण्यात आला.
तहसीलदारांनी नदीपात्रातील अवैध रस्ते हटविण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही गंभीर आरोप सभापतींनी केला आहे. मात्र, शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व सत्ताधारी नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ते व बांध हटविले. त्यामुळे डोहातील पाण्याची पातळी वाढली असून आता शहराला नियमित पाणीपुरवठा मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“पाण्याचे राजकारण करू नये. जनतेची सेवा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे,” असे सांगत त्यांनी विरोधी नगरसेवकांनाही सोबत घेऊन अडविण्यात आलेल्या पाण्याचे बांध दाखवून दिल्याचे नमूद केले.
पाणीपट्टी वाढीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आमदारांवर टीका केली. “पाणीपट्टी ९०० रुपयांवरून १८०० रुपये करताना जनतेची आठवण झाली नव्हती का?” असा सवाल करत, आमदारांच्या पत्नी नगराध्यक्ष असताना भर पावसाळ्यात नगरपरिषदेसमोर हंडा मोर्चा निघाल्याची आठवणही त्यांनी करून दिली.
२४x७ पाणीपुरवठा योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या योजनेचा प्रस्ताव तत्कालीन नगरपरिषदेकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावेळी स्वखर्चाने नदीपात्रात १४ बोअरवेल करण्यात आल्या तसेच कलाली डोह येथून सुमारे ८.५० कोटी रुपयांची तातडीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून नागरिकांना एक दिवसाआड पाणी देण्यात आले होते.
सध्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र भविष्यात सोलर यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
भविष्यातील गरजा लक्षात घेऊन २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून आमदार शिरीषदादा चौधरी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी ठेकेदाराला काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “अमळनेरकरांना लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सभापती कैलास पाटील यांनी शेवटी नमूद केले.



