वास्तव : झगमगाटाच्या मागचं विदारक सत्य करोडोंच्या लग्नसोहळ्यात ‘पन्नास हजारां’साठी झगडणारं एक कुटुंब…
![]()
वास्तव : झगमगाटाच्या मागचं विदारक सत्य
करोडोंच्या लग्नसोहळ्यात ‘पन्नास हजारां’साठी झगडणारं एक कुटुंब…
सध्या लग्नसराईची धामधूम सर्वत्र सुरू आहे. रोषणाई, डीजे, आलिशान हॉटेल्स, महागडे पोशाख, शेकडो पदार्थांची रेलचेल आणि दिखाव्याची स्पर्धा… समाजातील श्रीमंतीचे प्रदर्शन जणू काही उत्सवाचा अविभाज्य भाग बनले आहे. अशाच एका करोडपती नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी मी दोन-तीन दिवस मुक्कामाला गेलो होतो.
लग्न एका भव्य आणि आलिशान हॉटेलमध्ये होतं. वऱ्हाडातील पाहुण्यांसाठी ए.सी. रूम्स, विविध खाद्यपदार्थ, सेवेसाठी शंभराहून अधिक कर्मचारी, सर्वत्र चमचमणारी रोषणाई… एका दिवसाचा खर्चच दहा-पंधरा लाखांच्या घरात असावा. अनेक मंडळी तासागणिक नवे कपडे बदलत होती, सुगंधी स्प्रेने परिसर भारून टाकत होती. त्या झगमगाटात मी मात्र साध्या कपड्यांत, पायात चप्पल घालून थोडासा वेगळाच वाटत होतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी खाली आलो. विविध पदार्थांचे स्टॉल लागले होते. मी साधेपणाने नाश्ता घेत एका सोप्यावर बसलो. आजूबाजूला हास्य, गप्पा, संगीत आणि उत्साहाचं वातावरण होतं. पण त्या गर्दीत माझी नजर एका मुलावर जाऊन स्थिरावली.
तो हॉटेलमधील कामगार मुलगा होता. बाकी सर्व कर्मचारी हसतमुख दिसत होते; पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र ताण, अस्वस्थता आणि काळजी स्पष्ट जाणवत होती. तो पाहुण्यांशी हसून बोलत होता, पण काही क्षणांतच त्याचा चेहरा पुन्हा गंभीर होत होता. जणू मनात एखादं मोठं वादळ सुरू होतं.
थोड्याच वेळात त्याला फोन आला. तो घाईघाईने गेटबाहेर गेला. उत्सुकतेपोटी मीही त्याच्या मागोमाग गेलो. बाहेर एक वयोवृद्ध गृहस्थ त्याची वाट पाहत उभे होते. अंगावर फाटके कपडे, पायात तुटलेली चप्पल, चेहऱ्यावर उपासमारीच्या खुणा आणि डोळ्यांत काळजी…
दोघं काहीतरी बोलत होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. संभाषण संपल्यावर त्या मुलाने टिश्यू पेपरमध्ये दोन-तीन गुलाबजाम आणि बर्फी गुंडाळून त्या गृहस्थांच्या हातात दिली. ते दृश्य पाहून माझं मन सुन्न झालं.
दुसऱ्या दिवशी मला त्या मुलाशी बोलण्याची संधी मिळाली.
“काय नाव बेटा तुझं?” मी विचारलं.


तो हसत म्हणाला, “गौरव.”
“काय शिकतोस?”
“बी.एस्सी.च्या दुसऱ्या वर्षाला आहे.”
मी त्याला कालच्या घटनेबद्दल विचारलं. क्षणभर तो गोंधळला; पण नंतर डोळे पाणावलेले असतानाच बोलू लागला.
“सर, आम्ही खूप गरीब आहोत. आई लोकांच्या घरी स्वयंपाक आणि धुणीभांडी करते. बाबा हातगाडीवर काम करतात. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. पण काही दिवसांपासून आईच्या पोटात खूप दुखत होतं. तपासण्या केल्या तर डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन सांगितलं. पन्नास हजार रुपये लागणार होते. घरात एक पैसाही नव्हता…”
तो पुढे म्हणाला —
“मित्रांच्या ओळखीने मी या हॉटेलमध्ये कामाला लागलो. मालकाने माझी परिस्थिती पाहून पन्नास हजार देण्याचं मान्य केलं, पण आधी काही दिवस काम करावं लागेल असं सांगितलं. आज माझा पाचवा दिवस आहे. बाबा पैशांची विचारपूस करण्यासाठी आले होते…”
हे ऐकून माझ्या काळजाचा ठावच हरपला.
एका बाजूला करोडोंचा खर्च करून चाललेला जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, संगीताचा गजर… आणि दुसऱ्या बाजूला एका आईचा जीव वाचवण्यासाठी पन्नास हजार रुपयांसाठी धडपडणारं कुटुंब!
त्या क्षणी मनात अनेक प्रश्न निर्माण झाले.
समाज म्हणजे नेमकं काय?
माणुसकी म्हणजे काय?
दिखाव्याच्या या स्पर्धेत संवेदनांचा अंत होत चाललाय का?
मी काही क्षण निःशब्द उभा राहिलो. स्वतःची परिस्थितीही बेताचीच होती; तरी एटीएममधून पाच हजार रुपये काढले आणि गावाकडे परतताना गौरवच्या हातात ठेवले.
मी त्याला एवढंच सांगितलं —
“बेटा, ही छोटीशी मदत समज. आणि काहीही झालं तरी शिक्षण सोडू नकोस. कारण संघर्ष करणाऱ्यांचीच स्वप्नं एक दिवस मोठी होतात.”
त्या दिवशी मला समजलं —
झगमगाटाच्या प्रकाशापेक्षा संघर्षाच्या अश्रूंमध्ये जास्त सत्य दडलं असतं…
लेखन
✍️ किशोर एस. पाटील
बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालय, साकरे ता. धरणगाव
मो. ९७६४४७४३०९

