अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (अनामिक मद्यपी) ए. ए. संघटनेचा भारतातील प्रारंभ……
1 min read

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (अनामिक मद्यपी) ए. ए. संघटनेचा भारतातील प्रारंभ……

Loading

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (अनामिक मद्यपी) ए. ए. संघटनेचा भारतातील प्रारंभ……

मुंबई प्रतिनिधी(सुनील इंगळे)

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी. हि मद्यपींची संघटना होय. ही संघटना मद्यपींनी मद्यपिंसाठी मद्यपिंकडूनच चालवलेली गटोपचार पद्धत आहे. या संघटनेच्या ए. ए.सभांमध्ये ए. ए. बांधव मद्यपानाच्या काळातील अनुभव त्यासोबतच संघटनेच्या मदतीने प्राप्त केलेली मद्यमुक्ती आणि सुधारलेले समाधानी आयुष्य कथन करतात. थोडक्यात “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” असा हा जीवनोपयोगी सन्मार्ग आहे. त्यामुळे ए. ए. बांधवांचे मानसिक धैर्य, जगण्याची नवी आशा आणि दृढ आत्मविश्वास वृद्धिंगत होत असतो. संघटनेत कोणताही भेदभाव, जातीधर्म, उच्चनिच्चता नसून समानता आणि स्वावलंबनाची विचारधारा रुजवली जाते. केवळ मद्य सोडण्याची इच्छा असणे ही एकमेव अपेक्षा असून पैसा, देणगी, फी किंवा वर्गणी आकारली जात नाही. संस्थेचे सह संस्थापक बिल डब्लू आणि डॉ बॉब यांचे प्रथम भेटीतून या संघटनेच्या विचारसरणीचा जन्म १० जून १९३५ रोजी अमेरिकेत झालेला आहे. ए. ए. संघटनेची समूह उपचारपद्धती आज जगमान्य ठरलेली आहे.
विश्वबंधुत्व निर्माण करणाऱ्या अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए. ए.) चा भारतातील शुभारंभाचा इतिहास हा अतिशय महत्वपूर्ण आहे. दिल्ली येथे इंडियन नेव्हीमध्ये मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नेट्टो हे दिल्ली शहरातील मद्याचा त्रास भोगत असलेले मिसेस सिल्विया एस. आणि सुपांती यांचेवर उपचार करीत होते. डॉ. नेट्टो यांनीच त्या दोघांना सुचवल्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ए. ए.जनरल सर्व्हिस ऑफीसशी पत्रव्यवहार केला होता. त्याचवेळी बरीच वर्षे मद्यमुक्त असलेले चाल्स मार्शल यांची कॅनडाहून सेन्सॉर बोर्ड दिल्ली येथे नेमणूक झाली. तत्पूर्वी त्यांनी ए. ए.चे सहसंस्थापक बिल डब्लू यांचेकडे दिल्लीतील सदस्यांची विचारपूस केलेली होती. त्यावेळी त्यांना दिल्लीतील सिल्विया आणि सुपांती यांचे पत्ते मिळाले. श्री. मार्शल हे १२ जानेवारी १९५७ रोजी दिल्लीत येऊन त्या दोघांचा शोध घेऊन एक आठवड्यात त्यांना भेटले. शिवाय मार्शल यांनी स्थानिक वृत्तपत्रातून इच्छुक मद्यपिंना मद्यमुक्तीसाठी भेटण्याचे जाहीर आवाहन केले. ह्या आवाहनाला मुंबईतील मद्यपी हेरॉल्ड (हॅरी) यांनी प्रतिसाद देऊन ते मार्शल यांना भेटायला दिल्लीत आले. त्यादोहोंच्या चर्चेतून हॅरी एम. ५ मे १९५७ पासून मद्यापासून दूर झाले. हॅरी मुंबईत परतल्यावर अन्य मद्यपींशी ए. ए. कार्यपद्धतीवर चर्चा करू लागलेत. तिकडे दिल्लीमध्ये मार्शल हे सुद्धा ए. ए. प्रचाराचे कार्य करीत होते. मार्शल यांचे संपर्क आणि सहवासातून ट्रेव्हर के. हे ए. ए. बांधव २४ ऑक्टोबर १९५७ पासून तर ३१ डिसेंबर १९८६ अखेर म्हणजे मृत्यूपर्यंत मद्यमुक्त राहिलेत.ते सैन्य अधिकारी असल्याने त्यांच्या भारतात अनेक शहरांमध्ये बदल्या झाल्या. त्याही स्थितीत त्यांचे ए. ए. सेवाकार्य सुरू असल्यामुळे सिकंदराबाद येथे ए. ए. चा पाया रोवला गेला. तेथील संपर्कात आलेले ए. ए. बांधव आस्टिन हे ५० वर्षांपेक्षा जास्त काळ मद्य मुक्त होते. दिल्लीमधील ए. ए. समूह फारकाळ चालला नाही. मात्र मुंबईत ३० सदस्य बांद्रा येथे सॅम सी. यांचे निवासस्थानी एकत्र येऊन ए. ए. मीटिंग घेत होते. तेथून सर्वांच्या प्रयत्नाने माहीममधे व्हिक्टोरिया चर्चच्या आवारात ए. ए. सभा सुरू झाली. पुढे तो ए. ए. समुह माहीम येथेच मायकेल हायस्कूल येथे फाउंडेशन ग्रुप या नावाने उदयाला आला. संघटनेच्या उत्कर्षासाठी अनेक मदतीचे हात पुढे आलेले होते. त्यात डॉ. एम.डी. गिल्टर, मिसेस बरथा कास्टिलिनो, मिस. आय.जी. क्याझन तसेच ए. डी. सलढाना व स्टॅन घोनसालविस यांनी देखील हॅरी एम.यांना ए.ए. प्रचार व प्रसाराच्या कामी मोलाची मदत केलेली आहे. सन १९६२ च्या दरम्यान अनेक चर्चने ए. ए. मिटिंगसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचवेळी मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त श्री.रत्नाकर गायकवाड यांनी तर महापालिकांच्या शाळांमध्ये अत्यल्प भाड्यात साप्ताहिक ए. ए. सभांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. १९६५ मध्ये माहीम, दादर, बांद्रा हे मुख्य ए. ए. ग्रुप कार्यरत होते. १० जून १९६५ रोजी ए. ए. च्या जागतिक ३० व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने दादर येथे पाहिले ए. ए. बांधवांचे संमेलन आयोजित केले होते. त्या दरम्यान भारतातील संस्थापक ए. ए. बांधव मुंबईचे हॅरी एम. यांचे १० जून १९६७ रोजी निधन झाले.त्यावेळी हॅरी १० वर्षे मद्य मुक्त होते. १५ ऑगस्ट १९६७ रोजी बांद्रा येथे ए. ए. बांधव पिंटो यांचे निवासस्थानी ११ ए. ए. समुहांची सभा संपन्न झाली. त्या सभेत ऑगस्ट डी. यांनी मार्गदर्शक सूचनांना अंतिम स्वरूप देऊन १५ जुलै १९७५ पासून त्या सूचना आमलात आणल्या गेल्या आहेत. पुढे भायखळा येथील क्राईस्ट चर्च येथे ए. ए. आंतरसमूह कार्यालय सुरू झाले. कालांतराने देशपातळीवर ए.ए. सेवा मिळावी आणि ए. ए. समूहांना सहाय्यभूत होण्यासाठी *५ मे १९८७ रोजी* ए. ए. सामान्य सेवा कार्यालयाची (*ए. ए. जी.एस.ओ.*)ची स्थापना करण्यात आलेली आहे. आज भारतात जी. एस. ओ. द्वारे ए. ए. सेवाकार्य सुरू आहे. आज ए. ए. आंतर समूह, ए. ए. जिल्हा व एरिया समिती मिळून २२५ ए. ए. सेवा केंद्र कार्यरत असून ३१०० ए. ए. समूहातून सुमारे ६०,००० ए. ए. बांधव मद्यापासून दूर आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात ३६ जिल्ह्यात ६८८ ए. ए. समूहांद्वारे ७००० ए. ए. बांधव मद्यमुक्त आहेत. यासाठी ४६ ए. ए. आंतर समूह आणि ३ ए. ए. जिल्हा समिती ए. ए. सेवाकार्यात कार्यरत आहेत. भारतामध्ये ५ मे १९५७ मध्ये अल्कोहोलिक्स ॲनॉनिमसच्या सेवा कार्यास सुरुवात झाली. या कार्यास भारतात ५ मे २०२६ रोजी ६९ वर्षे पूर्ण होत आहेत आणि ए. ए. सामान्य सेवा कार्यालय (ए. ए. जी.एस. ओ.) केंद्रीय ए. ए. कार्यालयास ३९ वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या अलौकिक ए. ए. सेवाकार्यास मनःपुर्वक शुभेच्छा व्यक्त करून *जगा आणि जगू द्या* असा दिव्य संदेश देणारे हे कार्य सातत्याने वृद्धिंगत होत राहो अशी शुभकामना व्यक्त करतो….

*अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस (ए. ए.) संपर्कासाठी मोबाईल नंबर :*
*8097055134*
https://www.aagsoindia.org
*संकलन/शब्दांकन*
डी.बी.महाजन(अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (ए. ए.) चा हितचिंतक मित्र.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *