शाळा प्रवेशोत्सव : एक आनंददायी अक्षर सोहळा
1 min read

शाळा प्रवेशोत्सव : एक आनंददायी अक्षर सोहळा

Loading

शाळा प्रवेशोत्सव : एक आनंददायी अक्षर सोहळा.
मुंबई ​विशेष प्रतिनिधी (: उदय नरे)

​शाळेचा पहिला दिवस म्हणजे केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नसते; तो तर आयुष्याच्या एका नव्या मखमली प्रवासाचा श्रीगणेशा असतो. मुलांसाठी जणू हा दिवस रंगीत आणि सुगंधित असतो. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात शाळेच्या पहिल्या दिवसाला अतिशय आगळेवेगळे महत्त्व आहे. अगदी मोठे झाल्यावरही या दिवसाच्या आठवणी मोठ्यांच्या मनात देखील रुंजी घालत असतात. तो उत्साह, ती धाकधूक, जणू अत्तराच्या कुपीतून सांडलेला एखादा थेंब! आनंददायी, गुणवत्तापूर्ण आणि राष्ट्रीयत्वाच्या शिक्षणाचा भाग म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
​शिक्षणाचा ‘आनंदोत्सव’ आणि लोकोत्सव
​”शिक्षण ही केवळ पाठांतराची भिंत न राहता तो एक ‘आनंदोत्सव’ व्हावा, या भूमिकेतून हा ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा केला जातोय.”
​आता हा सोहळा केवळ एक सरकारी कार्यक्रम उरलेला नाही, तर या लोकोत्सवाला एका वेगळ्याच कौटुंबिक उबेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, विविध मंत्री तसेच पालकमंत्री स्वतः शाळांमध्ये उपस्थित राहून या आनंदात सामील होत आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत साजऱ्या होणाऱ्या या शाळा प्रवेशोत्सवाला राज्यातील विविध शाळा, शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांकडून अतिशय उत्स्फूर्त आणि उत्साही प्रतिसाद मिळत आहे.
​”पाखरे शाळेत निघाली” : एक वेधक जाहिरात
​मा. मंत्री शालेय शिक्षण श्री. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या “पाखरे शाळेत निघाली” या विशेष जाहिरातीची निर्मिती शालेय शिक्षण विभाग व बालभारती कडून करण्यात आली आहे.
​काव्य आणि आवाज: बालभारतीच्या ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या सुंदर कवितेला प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या आवाजाची जोड मिळाली आहे.
​वैशिष्ट्य: जितेंद्र जोशी यांच्या आवाजातील तो खास लहेजा थेट काळजाला भिडणारा असून, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमधील, वाड्यावस्त्यांवरील शाळांपासून ते मोठ्या शहरांमधील आधुनिक शाळांमध्ये मुलांचा होणारा आनंददायी प्रवास या जाहिरातीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *