मठगव्हाणचा सुपुत्र देशसेवेत; साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल पवार असिस्टंट कमांडंट पदावर विराजमान!
![]()
मठगव्हाणचा सुपुत्र देशसेवेत; साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल पवार असिस्टंट कमांडंट पदावर विराजमान!
अमळनेर प्रतिनिधी
मठगव्हाण ता अमळनेर
येथील साने गुरुजी विद्यालयाचा माजी विद्यार्थी यशपाल ज्ञानेश्वर पवार याने आपल्या जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर मोठे यश संपादन करत आज हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथे असिस्टंट कमांडंट पदाची शपथ घेत देशसेवेचा मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला. या अभिमानास्पद क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी त्याचे आई-वडील, बहिण दिव्या आणि भाऊ मोहित उपस्थित होते. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंनी या यशाचा क्षण अधिकच भावनिक आणि अविस्मरणीय ठरवला.
यशपाल पवार याचे यश हे केवळ त्याच्या कुटुंबापुरते मर्यादित नसून, संपूर्ण मठगव्हाण गाव, साने गुरुजी विद्यालय आणि परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. ग्रामीण भागातून कठोर परिश्रम करत राष्ट्रीय स्तरावरील या पदापर्यंत पोहोचणे हे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे.
शिक्षण घेत असताना यशपालने नेहमीच शिस्त, प्रामाणिकपणा आणि अभ्यासाची तळमळ जपली. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला आणि अनेक अडचणींवर मात करत अखेर यशाचे शिखर गाठले. त्याच्या या यशामागे कुटुंबाचा आधार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत यांचा मोठा वाटा आहे.
साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील तसेच श्रीमती अनिता बोरसे मॅडम, शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचारी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख सर यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
साने गुरुजी विद्यालय परिवारातर्फे यशपाल पवार याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळणार असून “कष्ट आणि चिकाटी असेल तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे.

