अक्षय्य तृतीयेला मासिक जनजागर सांगता सोहळा समाजातील विविध क्षेत्रांतील महानुभवांची लाभणार उपस्थिती
![]()
अक्षय्य तृतीयेला मासिक जनजागर सांगता सोहळा
समाजातील विविध क्षेत्रांतील महानुभवांची लाभणार उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी
अक्षय कृषी परिवार आणि मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीचा प्रारंभ गुरुवार, दि. १९ मार्च २०२६ रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान यांच्या शुभ हस्ते व विविध मंत्री महोदय आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झाला आहे. त्यानंतर हे अभियान गावपाड्यांसह संपूर्ण देशात राबविण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार दररोज या अभियानाचा जनजागर अमळनेर तालुक्यातील १५६ गावांमध्ये करण्याचे सुनिश्चित करण्यात आले. त्याप्रमाणे रोज नित्यनियमाने गावागावांत जनजागर रथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अभियानाचा उद्देश, महत्त्व आणि कार्य समजावून सांगितले जात आहे. श्री मंगळग्रह मंदिरात वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा तसेच भूमिमातेचा जन्मदिन या हिंदू नववर्षाच्या प्रारंभ दिनी सुरू झालेल्या अभियानास रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी एक महिना पूर्ण होत आहे. अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. जो वैशाख शुद्ध तृतीयेस साजरा होतो. याच पवित्र दिनी भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीचा मासिक जनजागर सांगता सोहळा अतिशय भव्य- दिव्य, भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात विधिवत करण्याचे सुनिश्चित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या या पवित्र मंगल सोहळ्यास समाजातील विविध क्षेत्रांतील महानुभवांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी शेतकऱ्यांना भूमी सुपोषण अभियानाचा उद्देश, कार्य, व्याप्ती व यांचे भविष्यातील सुपरिणाम कसे होऊ शकतात याबद्दलचा ऊहापोह केला जाणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्रातील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित राहणार आहेत.
शेतकऱ्यांनो, एक मूठ माती घेऊन आवर्जून सहभाग नोंदवा
श्री मंगळग्रह मंदिरात अक्षय्य तृतीया अर्थात रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळ मासिक जनजागरण सांगता सोहळा होणार आहे. याप्रसंगी अमळनेर तालुक्यासह परिसरातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातून एक मूठ माती सोबत आणावी. ही माती एकत्रित करून तिचे विधिवत पूजन आपल्या सर्वांच्या साक्षीने केले जाणार आहे. ही विधिवत अभिमंत्रित केलेली माती आपापल्या गावी परत नेवून आपापल्या शेतांत टाकावयाची आहे. ती टाकत असताना रासायनिक खाते व कीटकनाशकांचा बेसुमार वापर यापुढे कमीत कमी प्रमाणात करून शेतजमिनीची, विविध उत्पादनांची होणारी हानी टाळेल. तसेच येणाऱ्या पिढ्यांचे आरोग्य सुदृढ कसे राखले जाईल यासाठी निरंतर प्रयत्नशील राहील, असा संकल्पही आपणास करावयाचा आहे. त्यासोबतच भूमी सुपोषणाच्या या परमपवित्र कार्याचा स्वतःसह इतरांनाही जागर करण्यासाठी अभियानात सहभागी करावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
……

