४ मे रोजी होणाऱ्या डिजिटल मीडिया अधिवेशनासाठी श्रीपाद नाईक यांना निमंत्रण
![]()
डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन ४ मे रोजी पणजी (गोवा) येथे; केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे
गोवा प्रतिनिधी
पणजी (गोवा) : डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तिसरे अधिवेशन येत्या ४ मे रोजी पणजी, गोवा येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्री मा. श्रीपाद नाईक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे अभिवचन दिले असून, त्यामुळे अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांना औपचारिक निमंत्रण दिले. यावेळी संघटनेच्या कार्याबाबत, डिजिटल पत्रकारितेतील आव्हाने, तसेच भविष्यातील संधी यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या वतीने मंत्री महोदयांचे स्वागत करून त्यांना अधिवेशनात मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली, ज्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपस्थित राहण्याची खात्री दिली.
या अधिवेशनात राज्यभरातील तसेच देशातील विविध भागांतून डिजिटल माध्यमात कार्यरत पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. डिजिटल पत्रकारितेची वाढ, विश्वासार्हता, कायदेशीर संरक्षण, तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चासत्रे आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिवेशनातून डिजिटल मीडिया क्षेत्राला एक नवी दिशा मिळेल, तसेच पत्रकारांच्या समस्या आणि मागण्यांबाबत ठोस भूमिका मांडली जाईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरावर जोरदार तयारी सुरू असून, अधिवेशनाबाबत पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

