भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
![]()
‘भीम विचारांची गाणी’ या गीताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन
जळगांव प्रतिनिधी
मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ.म.सु.पगारे यांनी लिहिलेले ‘ भीम विचारांची गाणी’ हे गीत आज Dr. Sagar Chakranarayan या युट्युब चॅनल वर प्रकाशित झाले. हा कार्यक्रम आभासी पद्धतीने गुगल मीट वर आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवतावादी विचारवंत प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ कवी वा. ना. आंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात ते म्हणाले की, हे गीत पाहिल्यांना मी वाचलं आणि मग ते ऐकलं आणि त्याच्यात अत्यंत सुंदर बोध मला समजला तेव्हाच मी पगारे सरांना म्हणालो की हे गीत अत्यंत लोकप्रिय होणार आहे. यानंतर गीत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध शाहिरी गायक मा. नागसेन दादा सावदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या गीताचे बोल अत्यंत तर्कशील आणि विवेकी विचारांची शिदोरी आहे आणि ती आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची आहे.
कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी प्रा विजयकुमार गवई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात ते म्हणाले की, हे गीत ऐकून मला वामनदादांची आठवण झाली. हे गीत आजच्या काळात अत्यंत सुंदर आणि चळवळीला शुद्ध पद्धतीने पुढे नेणारं ठरणार आहे. ग्वाही त्यांनी दिली. यानंतर या गीताचे गायक डॉ. सागर चक्रनारायण यांनी आपला गीत प्रसारित करण्यामागचा अनुभव कथन केला. नंतर सम्राट वृत्तरत्न आनंद चक्र नारायण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सम्राट वृत्तपत्राच्या माध्यमातून पगारे सरांच्या लेखणीचा आस्वाद आम्हाला गेल्या एकवीस वर्षापासून मिळत आहे त्यांचे लेखन हे नेहमीच विचारांना दिशा देणारे असते.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व या गीताचे गीतकार प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. हे गीत लिहिण्या मागचा प्रवास त्यांनी सांगितला तसेच विद्यार्थी असल्यापासून आंबेडकरी चळवळीतील सक्रिय सहभाग व आज विद्यापीठीय पातळीवर वैचारिक प्रबोधन करत असतांना आपण देखील गीताच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ गतिमान करण्याचा मानस करावा वाटला म्हणून गीतलेखन केल्याचे मत अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. पुढे बोलतांना प्रा. डॉ. म.सु. पगारे यांनी चक्रनारायण आणि सम्राट कुटुंबा बरोबर त्यांचे कसे संबंध आहेत मग ते दलित साहित्याचा इतिहासाचे सदर असो किंवा विद्रोही सदर असो किंवा विविध ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून वारंवार घनिष्ट होत आहेत.
कार्यक्रमाचे निवेदन संशोधक विद्यार्थिनी सुकन्या जाधव यांनी केले तर आभार डॉ.दीपक खरात यांनी मानले तसेच जेष्ठ कवी वा. ना. आंधळे, कथाकार ऍड. विलास मोरे, प्रा. डॉ. किशोर पवार, प्रा.आशुतोष पाटील, महेश सूर्यवंशी, मनोज इंगोले, भागवत सपकाळ, सुबोध वाकोडे, वृषाली भोकरीकर, सरला तायडे, डॉ. विजय घोरपडे, कृष्णा संदनशिव, खेमराज पाटील, आनंद चक्रनारायण, अस्मादिक पगारे इत्यादी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

