संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड
1 min read

संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड

Loading

संघर्षातून यशाचा शिखर गाठला! देवगाव–देवळीच्या अमोल महाजनची पोलिस दलात निवड

अमळनेर प्रतिनिधी :
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण देवगाव–देवळी येथील अमोल अरुण महाजन याने घालून दिले आहे. महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचा माजीविद्यार्थी असलेल्या अमोलची पालघर येथे पोलीस पदावर निवड झाली असून, गावासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.
अमोलचे वडील श्री. अरुण गोपाळ महाजन यांच्या कष्टातून आणि कुटुंबाच्या पाठिंब्यावर त्याने हे यश संपादन केले. अत्यंत साध्या व गरीब परिस्थितीतून पुढे येत, त्याने आपल्या चिकाटीच्या बळावर स्वप्न साकार केले. त्याच्या या यशामुळे गावातून आणखी एक तरुण देशसेवेसाठी पुढे आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
देवगाव–देवळी गावात शिक्षणाची जाणीव आणि स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी ‘संघर्ष अभ्यासिका’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. गावातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या अभ्यासिका वर्गातून अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे. याच अभ्यासिकेतून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय व खासगी पदांवर कार्यरत असून, तेच पुढील पिढीला मार्गदर्शन करत आहेत.
गावात दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली सकारात्मक स्पर्धा, अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थ व शिक्षणप्रेमींचा सातत्यपूर्ण आर्थिक व मानसिक आधार यामुळे देवगाव–देवळी ‘आदर्श गाव’ म्हणून ओळख निर्माण करत आहे. अमोलसारखे अनेक विद्यार्थी या अभ्यासिका वर्गातून घडले असून, भविष्यातही अनेक तरुण विविध क्षेत्रांत यश संपादन करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमोल महाजनच्या या यशाबद्दल महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव शांताराम पाटील, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच गावकऱ्यांकडूनही त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अमोल महाजनचे यश हे केवळ एका व्यक्तीचे नसून, संपूर्ण गावाच्या एकजुटीचे आणि शिक्षणावरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे चित्र यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *