श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक महापूजा , ‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘संकटमोचन हनुमानजी की जय’चा जयघोष
![]()
श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त
श्री मंगळग्रह मंदिरात रुद्राभिषेक महापूजा
‘श्रीराम जय राम जय जय राम’, ‘संकटमोचन हनुमानजी की जय’चा जयघोष
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. 2 एप्रिल रोजी पहाटे 5 ते सकाळी 8 यावेळेत श्री मंगळेश्वर पंचमुखी हनुमानजींच्या मूर्तीवर अमळनेरमधील सुपरिचित भगवती टी स्टॉलचे संचालक बाळू अशोक पाटील व नगरसेविका सौ. छायाताई बाळू पाटील या दाम्पत्याच्या शुभ हस्ते विशेष रुद्राभिषेक महापूजा करण्यात आली.
प्रारंभी या दाम्पत्याने गणपती बाप्पांचे पूजन केले. त्यानंतर श्री मंगळेश्वर पंचमुखी हनुमानजींच्या मूर्तीवर विधिवत रुद्राभिषेक करण्यात येऊन हनुमान जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा पठण तसेच भाविकांकडून पुष्पवृष्टी होऊन पाळणा हलवत भक्तिमय व मंगलमय वातावरणात ‘श्रीराम जय राम जय जय राम’ ‘संकटमोचन हनुमानजी की जय’, असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर धूप, दीपसह नैवेद्य दाखवून महाआरती होऊन रात्री उशिरापर्यंत भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. त्यांना जयेंद्र वैद्य, अतुल दीक्षित, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, पवन शर्मा यांनी सहकार्य केले. त्यांना उमेश पाठक यांनी सहकार्य केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, मंगल सेवेकरी पुषंद ढाके यांच्यासह मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, श्री हनुमानजींच्या जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी श्री मंगळग्रह मंदिरात संगीतमय सुंदरकांडचेही आयोजन करण्यात आले.

