ज्ञानदीप प्रज्वलित करणारे ग्रंथदान; डॉ. म.सु. पगारे यांचा मानवतावादी उपक्रम , बहाळच्या साने गुरुजी वाचनालयाला ८६ हजारांच्या ३८१ पुस्तकांची बहुमोल भेट
![]()
ज्ञानदीप प्रज्वलित करणारे ग्रंथदान; डॉ. म.सु. पगारे यांचा मानवतावादी उपक्रम
बहाळच्या साने गुरुजी वाचनालयाला ८६ हजारांच्या ३८१ पुस्तकांची बहुमोल भेट
जळगाव प्रतिनिधी
डिजिटल युगातील मोबाईलच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थी वर्ग वाचन संस्कृतीपासून दूर जात असल्याची खंत व्यक्त होत असताना, या पार्श्वभूमीवर वाचनाची गोडी रुजविण्यासाठी मानवतावादी विचारवंत प्रा. डॉ. म.सु. पगारे यांनी स्तुत्य पुढाकार घेतला आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेचे संचालक व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असलेल्या डॉ. पगारे यांनी बहाळ (ता. चाळीसगाव) येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाला तब्बल ८६ हजार रुपये किमतीची ३८१ वैविध्यपूर्ण पुस्तके ग्रंथदानाच्या माध्यमातून दि. ३१ मार्च २०२६ रोजी सुपूर्त केली. वाचनालयाचे अध्यक्ष शिवराम चौधरी यांनी ही पुस्तके स्वीकारली.
या प्रसंगी उपाध्यक्ष भीमराव बोरसे, सचिव पी.एस. करंकाळ, दुय्यम सचिव संतोष भोई यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षण बहाळ येथे झाल्याने “मी गावाचा ऋणी आहे,” या कृतज्ञ भावनेतून डॉ. पगारे यांनी केलेले हे ग्रंथदान ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरले. वर्तमान आणि भावी पिढीला वाचनाची प्रेरणा देणारा हा उपक्रम गावकऱ्यांना भावला.
डॉ. पगारे हे सिद्धहस्त लेखक, समीक्षक, संशोधक, कवी आणि द्रष्टे वक्ते म्हणून राज्यभर परिचित आहेत. त्यांनी आजवर सुमारे ६० ग्रंथांची निर्मिती केली असून त्यांच्या साहित्यावर विविध विद्यापीठांत पीएच.डी. संशोधनही झाले आहे. इटली, व्हेनिस, मलेशिया, दुबई आणि पुणे येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या ‘बा’ आणि ‘तथागता’ या कवितांचे हिंदी, इंग्रजी आणि अहिराणी भाषेत अनुवाद झाले असून त्यांवरील समीक्षाग्रंथही प्रकाशित झाले आहेत.
ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्वाकडून आपल्या मातृभूमीला दिलेले हे ग्रंथदान समाजमनाला स्पर्श करणारे ठरले असून बहाळ ग्रामस्थ आणि वाचनालयाच्या संचालक मंडळाने याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.
यावेळी एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे, संशोधक विद्यार्थी कैलास पाटील व अस्मादिक पगारे यांचीही उपस्थिती लाभली.

