उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींचे सकाळी सत्र; युनियनच्या मागणीला अखेर यश १ एप्रिल ते ३० जूनदरम्यान बदलले वेळापत्रक; सेविका-मदतनिसांमध्ये समाधान
![]()
उन्हाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडींचे सकाळी सत्र; युनियनच्या मागणीला अखेर यश
१ एप्रिल ते ३० जूनदरम्यान बदलले वेळापत्रक; सेविका-मदतनिसांमध्ये समाधान
अमळनेर प्रतिनिधी: उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे आजपासून सकाळच्या सत्रात चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. युनियनचे रामकृष्ण बी. पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मागणी अखेर मान्य झाली आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई येथील आयुक्तांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजी आदेश जारी करत १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत अंगणवाडींचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवीन वेळापत्रकानुसार अंगणवाडी सकाळी ७.०० ते ७.१५ या वेळेत उघडून पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर ७.१५ ते ८.१५ व ८.३० ते १०.१५ या वेळेत पूर्व-शालेय शिक्षण दिले जाईल. सकाळी ८.१५ ते ८.३० दरम्यान नाश्ता, तर १०.१५ ते १०.४५ या वेळेत गरम ताजा आहार लाभार्थ्यांना दिला जाईल. पुढे १०.४५ ते ११.३० या वेळेत पोषण ट्रॅकर नोंदी व दप्तर लेखन, ११.३० ते १२.०० संदर्भ सेवा, तसेच १२.०० ते १.३० या वेळेत गृहभेटी, आरोग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि कुपोषित बालकांना आहार वाटपाची कामे पार पाडली जातील.
या निर्णयामुळे उन्हाच्या कडाक्यात लहान बालकांना होणारा त्रास कमी होणार असून, अंगणवाडी सेविका व मदतनिसांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. युनियनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, या यशाबद्दल रामकृष्ण बी. पाटील यांचे आभार मानण्यात येत आहेत.

