देहदानातून मानवतेचा उज्ज्वल संदेश; पहाडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श
1 min read

देहदानातून मानवतेचा उज्ज्वल संदेश; पहाडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श

Loading

देहदानातून मानवतेचा उज्ज्वल संदेश; पहाडे कुटुंबाचा प्रेरणादायी आदर्श

अमळनेर प्रतिनिधी: “अवयव स्वर्गात नव्हे, पृथ्वीवरच उपयुक्त ठरतात,” या उदात्त विचाराला कृतीत उतरवत अमळनेर येथील पहाडे कुटुंबाने देहदानाचा समाजाभिमुख निर्णय घेत मानवतेचा जिवंत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे शहरात अवयवदान व देहदानाबाबत सकारात्मक जनजागृतीला नवी दिशा मिळत आहे.

लायन्स क्लब ऑफ अमळनेरच्या वतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त वर्षभर विविध जनजागृती उपक्रम राबविले जातात. याच मोहिमेच्या पार्श्वभूमीवर संजय कांतीलाल पहाडे व पवन कांतीलाल पहाडे या बंधूंनी, लायन्स क्लबचे सदस्य महावीर पहाडे यांच्या माध्यमातून संस्थेशी संपर्क साधत देहदानाचा संकल्प साकार केला.

कांतीलाल पहाडे यांचे मंगळवार, दि. ३१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पूर्वसंमतीनुसार व कुटुंबीयांच्या सहकार्याने त्यांचे पार्थिव धुळे येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. या कृतीतून ‘मरणानंतरही समाजासाठी उपयुक्त ठरणे’ हा संदेश त्यांनी प्रत्यक्षात दिला.

याबाबत बोलताना चिरंजीव पवन व संजय पहाडे म्हणाले, “अवयवांची खरी गरज ही याच भूतलावर असते. गरजू रुग्णांना त्याचा लाभ व्हावा, हीच आमची भावना आहे. वडिलांचे आयुष्य सेवा व त्यागाने समृद्ध होते; त्याच विचारांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत.”

विशेष म्हणजे, पहाडे कुटुंबाने यापूर्वीही देहदानाच्या कार्यात पुढाकार घेतला आहे. महावीर पहाडे यांनी आपल्या मातोश्री कै. कांताबाई पहाडे यांचे देहदान करून समाजासमोर आदर्श निर्माण केला होता. त्यामुळे या कुटुंबाचे समाजाभिमुख कार्य अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे.

या निर्णयामुळे अमळनेर शहरात अवयवदानाबाबत जनजागृतीला चालना मिळाली असून अनेक नागरिक पुढाकार घेत देहदानाची प्रतिज्ञा करण्यास उत्सुक दिसत आहेत. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी अशा प्रेरणादायी कृतींची नितांत गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन महावीर पहाडे यांनी अधिकाधिक नागरिकांनी अवयवदान व देहदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी योगेश मुंदडा, प्रशांत सिंघवी, नीरज अग्रवाल, प्रदीप जैन, मनीष जोशी, विनोद अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, पंकज मुंदडा, डॉ. संदेश गुजराती, प्रसन्न शहा, प्रकाश शहा, डॉ. रवींद्र जैन यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.

चौकट :

देहदानाचे वैद्यकीय महत्त्व
देहदानामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीररचनेचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळते. तसेच संशोधन कार्यालाही मोठी मदत होते. त्यामुळे देहदान हे केवळ सामाजिक नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही अत्यंत महत्त्वाचे योगदान मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *