पत्रकारांचा आवाज दाबणे थांबवा, व्हॉईस ऑफ मीडियाचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा, पुढच्या आठवड्यात राज्यभर धरणे.
1 min read

पत्रकारांचा आवाज दाबणे थांबवा, व्हॉईस ऑफ मीडियाचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा, पुढच्या आठवड्यात राज्यभर धरणे.

Loading

पत्रकारांचा आवाज दाबणे थांबवा
व्हॉईस ऑफ मीडियाचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा
पुढच्या आठवड्यात राज्यभर धरणे.

मुंबई:
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रकारांवर होत असलेल्या कारवाया, धमक्या आणि प्राणघातक हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे पत्रकारितेचे स्वातंत्र्य धोक्यात आले असून, याविरोधात ‘व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने या प्रकरणांमध्ये तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के पाटील आणि महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया, अजितदादा कुंकुलोळ, नरेंद्र देशमुख यांनी याबाबत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात पत्रकारांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरू झाले आहे. अकोला येथे एका आमदाराविरोधात बातमी प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून टीव्ही नाईन मराठीचे प्रतिनिधी गणेश सोनोने, साम टीव्हीच्या वार्ताहर हर्षदा सोनोने यांच्यासह अन्य तीन पत्रकारांवर हक्कभंग दाखल करून त्यांना पाच दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वस्तुनिष्ठ पत्रकारितेला गुन्हेगारी ठरवण्याच्या या प्रकाराबाबत पत्रकार वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, नांदेडमध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ दाबण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवरून होताना दिसत आहे. पत्रकार मुक्ता कदम यांनी मनपा निवडणुकीदरम्यान पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या जनहिताच्या प्रश्नांवर बातम्या दिल्यानंतर, त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रशासनाचा गैरवापर करून पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे.
धमक्या आणि हल्ल्यांचे सत्रही थांबताना दिसत नाही. श्रीरामपूर येथे गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करणारे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, तर रत्नागिरीतील चिपळूणमध्ये पतसंस्थेतील गैरप्रकार उघड करणाऱ्या दीपक भागवत यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पनवेलमध्येही एका पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी मिळाल्याची घटना समोर आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे तर पत्रकारितेचा गळा घोटण्याचा धक्कादायक प्रयत्न झाला. अवैध दारू विक्रीविरोधात बातमी दिल्याने पत्रकार मनोज मन्नपूर्वे यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न आठ जणांच्या टोळीने केला. सुदैवाने, त्यांच्या पत्नीने आणि गावकऱ्यांनी धाव घेतल्याने हा प्रयत्न फसला. याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या सर्व घटनांचा निषेध करताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे संयोजक संचालक गोरक्षनाथ मदने, किशोर कारंजेकर यांनी स्पष्ट केले आहे की, पत्रकारांना गप्प बसवण्याचे हे प्रयत्न लोकशाहीसाठी घातक आहेत. संबंधित सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी विभागीय अध्यक्ष कुमार कडलग, संगम कोटलवार, सचिन मोहिते, कल्पेश महाले यांनी केली आहे.याविषयी पुढच्या आठवड्यात या मागणीसह इतर मागण्यासाठी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *