महाराष्ट्रातील वृत्तपत्र वाचवण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची सरकारला विनंती  ,  जाहिरात दरात दीडशे टक्के वाढीसह विविध मागण्यांवर निर्णयाची मागणी ,   दोन दिवसात निर्णय नाही घेतला तर, राज्यात आंदोलन अजून तीव्र करणार 
1 min read

महाराष्ट्रातील वृत्तपत्र वाचवण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची सरकारला विनंती ,  जाहिरात दरात दीडशे टक्के वाढीसह विविध मागण्यांवर निर्णयाची मागणी ,  दोन दिवसात निर्णय नाही घेतला तर, राज्यात आंदोलन अजून तीव्र करणार 

Loading

महाराष्ट्रातील वृत्तपत्र वाचवण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची सरकारला विनंती

जाहिरात दरात दीडशे टक्के वाढीसह विविध मागण्यांवर निर्णयाची मागणी

दोन दिवसात निर्णय नाही घेतला तर, राज्यात आंदोलन अजून तीव्र करणार

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र उद्योगावर वाढत्या आर्थिक ताणामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ इंटरनॅशनल फोरम’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये जाहिरात दरात १५० टक्के वाढ, शासकीय जाहिरात धोरणात पारदर्शकता, देयकांची वेळेत पूर्तता आणि लघु-मध्यम वृत्तपत्रांना न्याय्य संधी अशा विविध महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत.येत्या दोन दिवसात या संदर्भात निर्णय नाही घेतला तर राज्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने सुरु असलेले आंदोलन अजून तीव्र  करणार असा इशारा देण्यात आला आहे.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सादर केलेल्या या निवेदनात वृत्तपत्र उद्योगाची सध्याची बिकट आर्थिक स्थिती अधोरेखित केली आहे. सन २०१९ पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, वीज आणि मनुष्यबळ या मूलभूत खर्चामध्ये सुमारे १५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असताना शासनाच्या जाहिरात दरांमध्ये कोणतीही समर्पक वाढ झालेली नाही. त्यामुळे विशेषतः लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, यांची शिस्टमंडळाने घेतली भेट घेतली. माहिती घेऊन कळवू असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्हा मुख्यालयांवर मागील तीन दिवसांपासून लाक्षणिक आंदोलन सुरू आहे. तरीही यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन व आंदोलने करूनही शासनस्तरावर ठोस निर्णय झालेला नसल्याची खंतही या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनात मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये महागाई निर्देशांकानुसार सर्व वृत्तपत्रांसाठी किमान १५० टक्के जाहिरात दरवाढ तातडीने मंजूर करणे, ई-टेंडर जाहिराती संपूर्ण स्वरूपात प्रकाशित करणे, शासकीय जाहिरातींसाठी किमान २०० चौ. से. आकार निश्चित करणे, जाहिरातींची देयके ३० दिवसांच्या आत अदा करणे व विलंब झाल्यास व्याज देणे, लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी देणे, शासन निर्णय व बैठकींची माहिती वेळेत उपलब्ध करून देऊन पारदर्शकता राखणे, सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फतच देण्याची सक्ती करणे, तसेच जाहिरात यादीत समावेशासाठी प्रलंबित तपासणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून २५ वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करणे यांचा समावेश आहे. तसेच  पत्रकारिता क्षेत्रामध्ये दहा वर्षे सेवा करणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, शंकरराव चव्हाण पत्रकारिता पेन्शन निधीच्या अटी शिथिल करून वीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या व ५५ वर्ष वय असणाऱ्या पत्रकारांना पेन्शन निधीचा लाभ व्हावा ह्या दोन मागण्या पण यात आहे.
वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे नमूद करत, या क्षेत्रावर आर्थिक संकट ओढवले तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या माहितीच्या अधिकारावर होईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे वरील सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन वृत्तपत्र उद्योगाला दिलासा द्यावा, अशी मागणी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, माहिती व जनसंपर्क मंत्री तसेच महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ इंटरनॅशनल फोरम’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला नाही तर होणाऱ्या नुकसानीची तयारी ठेवावी असा इशारा दिला आहे.
राज्यात गेल्या तीन दिवसापासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ इंटरनॅशनल फोरम’ लाक्षणिक आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार असल्याचे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ इंटरनॅशनल फोरम’चे प्रमुख गोरक्षनाथ मदने, किशोर कारंजेकर, विजय चोरडिया, नरेंद्र देशमुख, अजितदादा कुंकूलोळ यांनी सांगितले आहे.  जर दोन दिवसांमध्ये निर्णय नाही झाला तर मंगळवारपासून राज्यातल्या सर्व तहसील जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर व्हाईस ऑफ मीडिया आंदोलन करणार आहे असेही सांगण्यात आले आहे.
________________________________________
फोटो ओळ: आंदोलनाची तीव्रता राज्यभर: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ इंटरनॅशनल फोरम’ चे लाक्षणिक आंदोलन राज्यभर सुरु आहे. हे आंदोलन अजून तीव्र करण्यात येणार असल्याचे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ इंटरनॅशनल फोरमच्या वतीने सांगण्यात आले आहे. आज संभाजीनगर येथे सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देऊन मागण्यासह आंदोलन करण्यात केले.
____________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *