ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे सुभाषित पठण स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची सुंदर जोपासना
1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे सुभाषित पठण स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची सुंदर जोपासना

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे सुभाषित पठण स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची सुंदर जोपासना

जळगाव (प्रतिनिधी) १४/०३/२०२६ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुभाषित पठण स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या संस्कारांची रुजवण करणे, संस्कृत भाषेची गोडी निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेत पारंगत करणे हा होता.
या स्पर्धेत इयत्ता आठवीतील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ही स्पर्धा जोडी पद्धतीने घेण्यात आली होती. प्रत्येक जोडीमध्ये एका विद्यार्थ्याने सुभाषिताचे सादरीकरण (पठण/गायन) केले, तर दुसऱ्या विद्यार्थ्याने त्या सुभाषिताचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. या अभिनव पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठांतर न करता त्यामागील आशय समजून घेण्याची संधी मिळाली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ सुभाषितांचे पठणच नव्हे, तर त्यामागील नैतिक मूल्ये, जीवनदृष्टी आणि मनाच्या स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. सुभाषितांमधून सत्य, प्रामाणिकपणा, शिस्त, आदरभाव, सहकार्य आणि कर्तव्यनिष्ठा यांसारख्या गुणांचा विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, वक्तृत्व कौशल्य विकसित होते आणि सुसंस्कारित नागरिक घडण्यास मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदेश करलकर यांनी केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री महेंद्र मिरकुटे यांनी कार्य पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
स्पर्धेत मुलं व मुली अशा स्वतंत्र गटांमध्ये निकाल जाहीर करण्यात आला. मुलांच्या गटातून तसेच मुलींच्या गटातून प्रत्येकी तीन जोड्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमामुळे विद्यालयात सकारात्मक व शैक्षणिक वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्यांची जपणूक अधिक दृढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *