साहित्य अकादमी पुरस्काराने ‘काळ्या निळ्या रेषा’चा गौरव; राजू बाविस्करांना मानाचा सन्मान , आत्मकथनाला नवा आयाम देणाऱ्या लेखनाची दखल; खान्देशसह मराठी साहित्यविश्वात आनंदाची लाट
![]()
साहित्य अकादमी पुरस्काराने ‘काळ्या निळ्या रेषा’चा गौरव; राजू बाविस्करांना मानाचा सन्मान,
आत्मकथनाला नवा आयाम देणाऱ्या लेखनाची दखल; खान्देशसह मराठी साहित्यविश्वात आनंदाची लाट
जळगांव प्रतिनिधी :
यंदाचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार लेखक राजू बाविस्कर यांना त्यांच्या बहुचर्चित ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मकथनपर पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. या सन्मानामुळे खान्देशच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्यविश्वात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘काळ्या निळ्या रेषा’ हे पारंपरिक आत्मचरित्र नसून, लेखकाच्या आयुष्यातील अनुभवांसोबतच त्यांना घडवणाऱ्या व्यक्तींचे प्रभावी व्यक्तीचित्रण या पुस्तकात मांडले आहे. ‘बलुतं’, ‘अक्करमाशी’, ‘उपरा’, ‘आयदान’, ‘आठवणींचे पक्षी’ यांसारख्या दलित आत्मकथनांच्या परंपरेला पुढे नेत, बाविस्कर यांनी आपल्या लेखनातून नव्या पिढीचा वेगळा अनुभवविश्व मांडले आहे.
या पुस्तकात लेखकाच्या दहावीपर्यंतच्या आयुष्याचा तपशीलवार लेखाजोखा असून, त्यामध्ये आंबेडकरी विचारांचा सूक्ष्म स्पर्श जाणवतो. आत्मकथन आणि अनुभवकथन यांचा संगम साधत, त्यांनी सामाजिक वास्तव, बदलती छळव्यवस्था आणि नव्या स्वरूपातील जातीयतेवर भाष्य केले आहे. दलित आत्मकथनाच्या चौथ्या पिढीतील हे लेखन मानले जात असून, नव्या पिढीच्या संघर्षाचे प्रतिबिंब त्यात ठळकपणे उमटते.
आजही बदलत्या स्वरूपात अस्तित्वात असलेल्या सामाजिक विषमतेवर प्रखर भाष्य करताना, लेखकाने राज्यघटनेचे महत्त्व आणि सामाजिक समतेची गरज अधोरेखित केली आहे. शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवरही या पुस्तकातून विचारप्रवर्तक मांडणी करण्यात आली आहे.
राजू बाविस्कर यांच्या या साहित्यकृतीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, त्यांच्या पुढील लेखनासाठीही साहित्यविश्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.
राजू बाविस्कर यांना या मानाच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन आणि पुढील साहित्यप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त
शशिकांत हिंगोणेकर
अध्यक्ष, स्मृतीशेष चमेलीभाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगाव यांनी व्यक्त केल्या आहेत.


