डहाणू नगरपरिषदेत जागतिक महिला दिन जल्लोषात; सन्मान, प्रेरणा आणि आरोग्यजागृतीचा संगम  , महिला बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या मार्गदर्शनातून महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश
1 min read

डहाणू नगरपरिषदेत जागतिक महिला दिन जल्लोषात; सन्मान, प्रेरणा आणि आरोग्यजागृतीचा संगम , महिला बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या मार्गदर्शनातून महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश

Loading

डहाणू नगरपरिषदेत जागतिक महिला दिन जल्लोषात; सन्मान, प्रेरणा आणि आरोग्यजागृतीचा संगम

महिला बालकल्याण विभागाचा स्तुत्य उपक्रम; मान्यवरांच्या मार्गदर्शनातून महिलांना आत्मनिर्भरतेचा संदेश

डहाणू प्रतिनिधी :
डहाणू नगरपरिषद, महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांचा सन्मान, त्यांच्या कार्याचा गौरव आणि समाजातील त्यांच्या योगदानाची जाणीव करून देणारा हा सोहळा ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. अक्षय गुडधे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिका मा. सौ. अनुपमा जाधव, वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. सौ. मृगनयना जाधव, बालकल्याण सभापती मा. सौ. युगाली संदेश पाटील तसेच नगरसेविका यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

यानंतर मुख्याधिकारी अक्षय गुडधे, प्रमुख अतिथी अनुपमा जाधव आणि डॉ. मृगनयना जाधव यांचा सौ. युगाली संदेश पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मुख्याधिकारी अक्षय गुडधे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे महिलांना नवी प्रेरणा मिळते, असे सांगितले.
डॉ. मृगनयना जाधव यांनी महिलांना आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या एन.सी.डी. (Non-Communicable Diseases) कार्यक्रमाची माहिती देत महिलांनी नियमित तपासणी करण्याचे आवाहन केले.

ज्येष्ठ साहित्यिका सौ. अनुपमा जाधव यांनी आपल्या प्रभावी भाषणातून महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच वाचन, मनन आणि स्वतःतील गुणांचा विकास करण्यावर भर दिला. कष्टकरी व श्रमिक महिलांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी महिलांनी न्यूनगंड न बाळगता आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला. जिजामाता, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन उंच शिखर गाठण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी सादर केलेल्या कवितेने कार्यक्रमात विशेष रंगत आणली—
“स्त्री आदिशक्ती आहे, ती रान तुडवते, विमान उडवते,
डोंगर चढते, लढाई लढते…
काय आहे तिच्यात कमी? कमी नाही काही…
तिने कवेत घेतल्या दिशा या दाही…!”
या ओळींमधून महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करत त्यांनी सर्वांना प्रेरित केले.

कार्यक्रमात महिला सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांसाठी विविध खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली आणि सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.

या कार्यक्रमाला नगरसेविका सौ. भारती पाटील, शुभांगी पाटील, प्रतिक्षा सुरती, अश्विनी पटेल, मनीषा वावरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिक्षा अरबुने यांनी प्रभावीपणे केले. श्री. वैभव हेगडे आणि श्री. संदेश पाटील यांचेही सहकार्य लाभले.

संपूर्ण कार्यक्रम महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरला आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *