दुःखात धावून आलेले प्रशासन… बालासोरचे जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी ठरले मदतीचा आधार, ओडिशातील भीषण अपघातात मृत झालेल्या बारामतीच्या महिला यात्रेकरूचे पार्थिव एयर अँम्बुलन्सने महाराष्ट्रात; धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची संवेदनशील मदत
![]()
दुःखात धावून आलेले प्रशासन… बालासोरचे जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी ठरले मदतीचा आधार
ओडिशातील भीषण अपघातात मृत झालेल्या बारामतीच्या महिला यात्रेकरूचे पार्थिव एयर अँम्बुलन्सने महाराष्ट्रात; धुळे जिल्ह्याच्या सुपुत्राची संवेदनशील मदत
जळगाव प्रतिनिधी :
ओडिशा राज्यातील बालासोर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघातानंतर दुःखाच्या वातावरणातही प्रशासनाच्या तत्परतेचा आणि संवेदनशीलतेचा प्रेरणादायी अनुभव समोर आला आहे. बारामती तालुक्यातील माळवाडी (लोणी) येथील धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या यात्रेकरूंवर ओडिशामध्ये झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र बालासोरचे जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी यांच्या पुढाकारामुळे मृत महिलेचे पार्थिव तब्बल 36 तासांचा प्रवास टाळून एअर अॅम्बुलन्सद्वारे थेट महाराष्ट्रात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील माळवाडी (लोणी) येथील ११ यात्रेकरू प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराच्या दर्शनासाठी ओडिशाला गेले होते. शुक्रवार (दि. १३ मार्च) रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या क्रूझर वाहनाचा बालासोर परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. काही प्रवाशांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले तर काहींना मणक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर काही काळ प्रवाशांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांनी तातडीने संबंधित यंत्रणांशी संपर्क साधत अपघाताची माहिती मिळवली.
थोड्याच वेळात फकीर मोहन मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बालासोर येथे सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संगीता काळोखे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघातग्रस्त क्रूझर वाहनाचे चालक हेच त्यांचे पती नामदेव काळोखे होते. नामदेव काळोखे किरकोळ जखमी झाले असले तरी संगीता यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे निधन झाले.
मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी साधारण ३६ तास लागले असते. मात्र या वेळी बालासोरचे जिल्हाधिकारी मयूर सूर्यवंशी यांनी संवेदनशील निर्णय घेत प्रशासनाच्या माध्यमातून एअर अॅम्बुलन्सद्वारे पार्थिव पुण्यात पाठविण्याची व्यवस्था केली. त्यामुळे संगीता काळोखे यांचे पार्थिव लवकरच त्यांच्या गावी पोहोचणार असून कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे २०१८ बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मयूर सूर्यवंशी हे मूळचे धुळे जिल्ह्यातील कौठळ गावचे रहिवासी आहेत. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेला हा अधिकारी संकटाच्या काळात मदतीला धावून आल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. तसेच ते मांडळ (ता. अमळनेर) येथील माजी पंचायत समिती सभापती डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांचे भाचे आहेत.
या संपूर्ण घटनेत प्रशासनाची तत्परता, मानवी संवेदनशीलता आणि महाराष्ट्राशी असलेली भावनिक नाळ यामुळे दुःखाच्या प्रसंगातही कुटुंबीयांना दिलासा मिळाला. त्यामुळे “दुःख अडवायला उंबऱ्यासारखा… कलेक्टर असावा मयूर सूर्यवंशीसारखा” अशा शब्दांत नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

