आनंदखेडेच्या कु. दर्शना गवते हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमक; १० मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदक , पंजाबच्या मोहाली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी
![]()
आनंदखेडेच्या कु. दर्शना गवते हिची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चमक; १० मीटर पिस्तूल प्रकारात ब्राँझ पदक
पंजाबच्या मोहाली येथे पार पडलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी
अमळनेर प्रतिनिधी :
क्रीडाक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी आनंदखेडे येथील आदरणीय केंद्रप्रमुख दादासो. राजेंद्रजी गवते सर यांची सुकन्या कु. दर्शना राजेंद्र गवते हिने पुन्हा एकदा आपल्या गावाचे, कुटुंबाचे आणि जिल्ह्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे.
पंजाब राज्यातील मोहाली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया वोट कौन्सिल ऑफ द डीफच्या तिसऱ्या राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कु. दर्शना गवते हिने १० मीटर पिस्तूल स्पर्धेत उत्कृष्ट नेमबाजीचे कौशल्य दाखवत ब्राँझ पदक पटकावले. तिच्या अचूक लक्ष्यभेदामुळे स्पर्धेत उपस्थित असलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांनी तिच्या कामगिरीचे कौतुक केले.
विशेष म्हणजे यापूर्वीही दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत कु. दर्शना हिने ब्राँझ पदक जिंकून आपली सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि क्रीडाप्रेमाची प्रचिती दिली होती. त्यामुळे अल्पावधीतच तिने राष्ट्रीय स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
या यशामागे कु. दर्शना हिचे कठोर परिश्रम आणि चिकाटी तर आहेच; शिवाय परमवीर शूटिंग, धुळे येथील कुशल प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभले आहे. विशेषतः पिस्तूल कोच आदरणीय श्री. विपिनजी सोनवणे तसेच रायफल कोच आदरणीय श्री. कपिलजी पाटील यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे आणि प्रेरणेमुळे दर्शना हिने हे यश संपादन केले आहे.
कु. दर्शना गवते हिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे आई-वडील, कुटुंबीय, मार्गदर्शक प्रशिक्षक तसेच मित्रपरिवार यांचे सर्वत्र कौतुक होत असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशामुळे आनंदखेडे गावासह संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिचे अभिनंदन अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी ,तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक मित्र परिवार यांनी केले.

