गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना जागीच शासकीय सेवांचा लाभ , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते उद्घाटन • ८०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती
![]()
गडखांब येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; शेकडो नागरिकांना जागीच शासकीय सेवांचा लाभ
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते उद्घाटन • ८०० पेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती
अमळनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ शनिवार (दि.१४) रोजी गडखांब, मंडळ नगाव, ता. अमळनेर येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
शिबिराचे उद्घाटन तहसीलदार मा. श्री. रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, तालुका स्तरावरील शासकीय कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी स्वतंत्र काउंटर व माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून विविध सेवांचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ पुढीलप्रमाणे :
पुरवठा शाखा : १३७ नवीन व दुबार शिधापत्रिका वितरित
संगायो शाखा : ९९ लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, २३५ हयात प्रमाणपत्रे, ४२ नवीन अर्ज स्वीकार
७/१२ दुरुस्ती : ३१ प्रकरणे
फेरफार नोंदी : २२ प्रकरणे
७/१२ वाटप : ७२० उतारे
इतर उतारे : ४१०
सेतु शाखा : ३१८ उत्पन्न दाखले, १३५ रहिवासी दाखले, ४९ जातीचे दाखले व १३ नॉन-क्रिमिलिअर प्रमाणपत्रे वितरित
या शिबिराला सुमारे ८०० ते ८५० नागरिकांनी उपस्थिती लावली. विविध शासकीय योजना व सेवांची माहिती नागरिकांना थेट देण्यात आली तसेच अनेक प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात आला.
यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी शिबिराची प्रस्तावना मांडून शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या शेवटी निवासी नायब तहसीलदार श्री. सी. यू. पाटील यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.
या महसूल समाधान शिबिरामुळे गडखांब व परिसरातील नागरिकांना शासकीय सेवा थेट गावपातळीवर मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.


