ओव्हरलोड रेती डंपरांचा अमळनेरमध्ये धुमाकूळ; तात्काळ कारवाईची शिवसेनेची मागणी
![]()
ओव्हरलोड रेती डंपरांचा अमळनेरमध्ये धुमाकूळ; तात्काळ कारवाईची शिवसेनेची मागणी
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर शहर व परिसरातून सध्या मोठ्या प्रमाणावर रेतीची डंपरद्वारे वाहतूक सुरू असून अनेक डंपरमध्ये नियमांपेक्षा जास्त प्रमाणात रेती भरून (ओव्हरलोड) वाहतूक केली जात असल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे. या प्रकारामुळे शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत असल्याची बाब शिवसेनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अमळनेरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक रस्त्यांवरून ओव्हरलोड रेतीचे डंपर दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही बेधडकपणे धावत असून शासनाच्या वाहतूक नियमांचे उघडपणे उल्लंघन होत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज होत असून शहरातील सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित डंपर चालक व मालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात लवकरात लवकर कारवाई न झाल्यास शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, शिवसेना तालुकाप्रमुख गुलाबराव पाटील, नगरसेवक साहेबराव पवार, नगरपरिषदेचे गटनेते पंकज चौधरी, शहरप्रमुख भरत पवार, विलास कंखरे, नगरसेवक नाविद शेख, युवासेना शहरप्रमुख प्रवीण पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी नोंदवली.
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पावले उचलून बेकायदेशीर व ओव्हरलोड रेती वाहतूक बंद करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

