राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जळगावच्या रत्नमाला शिंदे यांचा गौरव* *जलदूत-एक जीवनदायी नवोपक्रमा’ला उल्लेखनीय यश*
![]()
*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जळगावच्या रत्नमाला शिंदे यांचा गौरव*
*जलदूत-एक जीवनदायी नवोपक्रमा’ला उल्लेखनीय यश*
जळगाव (प्रतिनिधी):
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या संशोधन विभागातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२५-२६’ मध्ये जळगाव येथील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षणसेविका रत्नमाला शिंदे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून १०७० उपक्रम या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातील पूर्व माध्यमिक स्तरावर त्यांना सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करून पुणे येथील महात्मा फुले सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. हा बहुमान त्यांना SCERT चे संचालक मा. डॉ. हेमंत वसेकर (IAS), सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, डॉ. दत्तात्रय थिटे आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ श्री. ह. ना. जगताप या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रत्नमाला यांनी सादर केलेला ‘जलदूत: एक जीवनदायी नवोपक्रम’ जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून, विभाग आणि राज्य अशा कठीण टप्प्यांतील तांत्रिक परीक्षणातून पुढे गेला होता. आजच्या काळातील पाण्याची वाढती टंचाई आणि जलसाक्षरतेची गरज ओळखून त्यांनी राबवलेल्या या प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीचे संस्कार आणि पर्यावरणाची जाणीव अत्यंत प्रभावीपणे रुजवली गेली आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून पाण्याचे व प्लास्टिक पुनर्वापराचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्याच्या आणि ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल खान्देश
कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री नंदकुमार बेंडाळे, सर्व कार्यकारिणी सदस्य, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे,पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे, सर्व शिक्षकवृंद यांनी विशेष सत्कार करून सन्मान केला. येत्या काळात या नवोपक्रमाला आणखीन व्यापक स्वरूप देण्याचा त्यांचा मानस आहे.

