प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी…  क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व  ९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा
1 min read

प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी… क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व ९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा

Loading

प्रेरणादायी पॉझिटिव्ह बातमी…

क्लर्क ते नायब तहसीलदार : प्रामाणिक सेवेतून घडलेले आदर्श व्यक्तिमत्त्व

९१ वर्षांचा जीवनप्रवास प्रेरणादायी; अध्यात्म, शिस्त आणि सचोटीची उज्ज्वल परंपरा

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, अध्यात्माची गोडी आणि समाजाभिमुख जीवन जगत अनेकांना प्रेरणा देणारे माजी नायब तहसीलदार श्री. रामचंद्र पुंडलिक उपासनी यांनी ९१ वर्षे पूर्ण करून ९२ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील रहिवासी, मित्रमंडळी व कुटुंबीयांनी एकत्र येत त्यांचा स्नेहपूर्ण सत्कार करत वाढदिवस उत्साहात साजरा करीत आहेत..
सन १९३५ मध्ये अमळनेर येथील पाठक गल्ली येथे जन्मलेल्या उपासनी यांचे बालपण अत्यंत खडतर परिस्थितीत गेले. मात्र जिद्द, कष्ट आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर त्यांनी जीवनात मोठे यश संपादन केले. १० नोव्हेंबर १९५९ रोजी तहसील कार्यालय जळगाव येथे लिपिक म्हणून त्यांनी शासकीय सेवेला सुरुवात केली. कर्तव्यनिष्ठा, पारदर्शकता आणि सचोटीच्या बळावर त्यांनी क्लर्क पदापासून ते नायब तहसीलदार पदापर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.
महसूल खात्यात कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या. कोणताही डाग न लागता त्यांनी प्रशासनात पदाची प्रतिष्ठा उंचावली. शिवधाम तपोवन, ता. पारोळा येथील धार्मिक कार्यात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना २१ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले होते. दीर्घ सेवेनंतर ३१ मार्च २००३ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
विशेष म्हणजे नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ते सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत कामाचा उत्साह आणि कर्तव्यनिष्ठा कायम टिकून राहिली. पदावर असताना जी प्रतिष्ठा आणि मान त्यांना मिळत होती, तीच ओळख आजही कायम आहे. असे सहसा घडत नाही; ९९ टक्के लोकांना हे साध्य होत नाही, पण उपासनी हे त्या १ टक्क्यांतील व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानले जातात.
उपासनी यांचे व्यक्तिमत्त्व केवळ प्रशासकीय क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते अध्यात्म, संस्कार आणि ज्ञानाचा खजिना मानले जाते. ते निस्सीम विठ्ठल भक्त असून ज्ञानेश्वरी, भागवत, श्रीकृष्ण चरित्र आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे त्यांना अस्खलित पाठांतर आहे. भगवद्गीता आणि भागवत महात्म्याचे त्यांनी स्वतः अभ्यास करून त्याचे संक्षिप्त लेखनही केले आहे.
त्यांची अभ्यासू वृत्ती, सतत वाचनाची सवय आणि प्रामाणिक जीवनपद्धती आजही कायम आहे. महसूल खात्यात त्यांनी इमानदारीने मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडून पदाची प्रतिष्ठा उंचावली. हरहुन्नरी, बहुआयामी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ते समाजात ओळखले जातात.
आजच्या घडीला ९१ वर्षांचे असूनही त्यांची स्मरणशक्ती विलक्षण आहे. वाचनाची आवड आजही कायम आहे. दररोज येणारे वर्तमानपत्र ते मन लावून वाचतात. “आहार, विहार आणि निद्रा” ही जीवनातील त्रिसूत्री त्यांनी आयुष्यभर जपली आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून त्यांनी रात्रीचे जेवण पूर्णपणे टाळले असून झोपताना फक्त दूध घेतात. शुद्ध शाकाहार, निर्व्यसनी जीवनशैली आणि सकारात्मक विचारसरणीमुळे ते आजही सर्व अवयवांनी तंदुरुस्त असून निरोगी जीवन जगत आहेत.
त्यांचे बालपण खडतर, तरुणपण कर्तृत्ववान आणि वृद्धत्वही तितकेच प्रेरणादायी असे राहिले आहे. जीवनप्रवासात काही दुःखद प्रसंगही आले. त्यांच्या धर्मपत्नींचे २०१९ मध्ये निधन झाले. मात्र मुलगी सौ. स्मिता जितेंद्र चंद्रात्रे (अध्यक्ष, अमळनेर तालुका ग्राहक मंच) आणि जावई उद्योगपती श्री. जितेंद्र उर्फ बापूसाहेब चंद्रात्रे (शोभा इंडस्ट्रीज) तसेच नातवंडांच्या प्रेमळ सहवासामुळे त्यांना नव्या उमेदीने जीवन जगण्याची प्रेरणा मिळत आहे.
भालेरावनगर व पाटीलगढी परिसरातील नागरिकांसाठी उपासनी हे प्रेरणास्थान व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व मानले जाते. परिसरातील सर्व रहिवासी एकत्र येऊन विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवतात. सण-उत्सव, होळी, धुलीवंदन, दसरा, दिवाळी, जयंती, व्याख्याने, भागवत, सुरसंगम, खेळ व विविध स्पर्धा अशा कार्यक्रमांत सर्वजण एकत्र येतात. या उपक्रमांत उपासनी यांचे मार्गदर्शन आणि उपस्थिती सर्वांना प्रेरणा देणारी ठरते.
उपासनी यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, शिस्त, संस्कार आणि अध्यात्माचा सुंदर संगम आहे. “हसत-खेळत आयुष्य जगा, कारण रडत तर सगळेच जन्माला येतात,” हा त्यांचा जीवनमंत्र आजही अनेकांना प्रेरणा देत आहे.
भालेराव नगर व पाटील गडी परिसरातील ज्येष्ठ, आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे उपासनी बापू हे खऱ्या अर्थाने त्या भागाचे भीष्म पितामह आहेत. त्यांच्या शब्दाला परिसरातील सर्व बांधव मान देतात. एकदा दिलेला शब्द पाळणे आणि शब्दाला किंमत देणे ही त्यांची जणू जीवनशैलीच आहे.
कोणीही अनोळखी व्यक्ती समोर आली तरी तिचे मनापासून स्वागत करणे हा त्यांचा स्वभाव आहे. माणुसकीची ऊब आणि आत्मीयता त्यांच्या प्रत्येक वागण्यातून जाणवते. त्यांच्या सहवासात बसून गप्पा मारतांना वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. ज्ञान, अनुभव आणि जीवनदृष्टीचा मोठा खजिना असलेले असे विद्वान, प्रेमळ आणि आदर्शवत बापमाणूस क्वचितच पाहायला मिळतात.
मागील वर्षी भालेराव नगर व पाटील गडी कॉलनीतील सर्व ज्येष्ठ नागरिक, बांधव व भगिनी एकत्र येऊन उपासनी बापूंचा ९१ वा वाढदिवस अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला होता.
आळंदी संस्थानचे पदाधिकारी यांनी बापूंना आळंदीला बोलावले…
त्यांच्या हस्ते विठ्ठलाच्या साक्षीने मंदिरात वाढदिवस साजरा करून या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा करण्यात आला.
अशा प्रेमळ, विद्वान आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वामुळे उपासनी बापू हे आजही परिसरातील अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
९२ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशी सर्वांची भावना व्यक्त होत आहे.

वर्षे झाली एक्याण्णव तरी उत्साह तरुणांचा ठसा,
ज्ञान, संस्कार, अध्यात्म यांचा त्यांच्या जीवनात वसा.
हसत-खेळत जगण्याचा दिला त्यांनी सुंदर संदेश,
उपासनी बापूंना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा विशेष.
🎂🎂🎂🎂💐💐
शब्दसंकलन
मा. आबासाहेब गोकुळ पाटील
सेवानिवृत्त आदर्श केंद्रप्रमुख अमळनेर
जि.जळगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *