जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरची रणरागिणी हरपली; डॉ. अपर्णा मुठ्ठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली , महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि वैद्यकीय सेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचे ८२ व्या वर्षी निधन; अमळनेरच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी
1 min read

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरची रणरागिणी हरपली; डॉ. अपर्णा मुठ्ठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली , महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि वैद्यकीय सेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचे ८२ व्या वर्षी निधन; अमळनेरच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी

Loading

* *स्वर्गवासी डॉ अपर्णा मुठ्ठे : एक गौरवगाथा*

 

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेरची रणरागिणी हरपली; डॉ. अपर्णा मुठ्ठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

महिला सक्षमीकरण, सामाजिक ऐक्य आणि वैद्यकीय सेवेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचे ८२ व्या वर्षी निधन; अमळनेरच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी

 

आठ मार्च हा जागतिक महिला दिन आपण साजरा करीत असतो त्या अनुषंगाने आज मला अमळनेरच्या एका कर्तुत्ववान रणरागिणी, अनेक भगिनींच्या व आमच्या सारख्या निकटवर्ती यांचे आधारवड स्वर्गवासी डॉ . अपर्णा ताई मूठ्ठे यांचे नुकतेच २मार्च २०२६रोजी दुःखद निधन झालेले आहे.या बद्दल थोडक्यात माहिती .

अमळनेरचे प्रसिद्ध मुठ्ठे कुटुंबियांच्या त्या स्नुषा होत तर मुंबई त्यांचे माहेर होते परंतु आपल्या अफाट कर्तुत्वाने मेहनतीने समाजात एक आपली आगळी वेगळी अशी ओळख निर्माण केली .एक शिस्तप्रिय, हजर जबाबी परंतु चेहऱ्यावर सतत स्मित हास्य असणारी कोणाची मोठी बहीण तर कोणाची ताई तर कोणाची आई अशा अनेक भूमिका त्यांनी कालांतराने जोपासलेल्या होत्या. कुठे महिला भगिनींची सहल किंवा भ्रमंती असेल तर सर्वांची जबाबदारी त्या सांभाळत व सर्वांना प्रेमाने आपलेसे करून घेत लहान-मोठ्यात सहज मिसळून जात असत.

*लेडीज जिम व* *विद्यार्थ्यांनी साठी स्वतंत्र अभ्यासिका*

अमळनेर शहरात प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र असे जिम व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका अमळनेर नगर परिषदेच्या सौजन्याने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या वर त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने उभे केले . आज याचा उपभोग सर्व भगिनी व विद्यार्थिनी घेत आहे ही समाधानकारक बाब आहे.

*अमळनेर महिला मंच ट्रस्टची स्थापना*

शहरातील सर्व युवती माता भगिनी या सर्वांना संघटित करून त्यांच्यातील सुप्तगुण हेरून त्यांचे विविध संघटनांमध्ये वर्णी लावून त्यांच्याकडून समाजसेवा करून घेणे हा छंद त्यांनी आयुष्यभर जोपासला होता. एखादे काम हाती घेतले की ते पूर्णतडीस नेण्याचे कसब त्यांच्या अंगी होते . अमळनेर शहरात अमळनेर महिला मंच ट्रस्ट ची अधिकृत स्थापना आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत करून त्या गेल्या पाच वर्षापासून त्या निर्विवादपणे अध्यक्ष होत्या. अमळनेर महिला मंच व अमळनेर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी गेल्या चार-पाच वर्षापासून नियमितपणे वर्षाच्या सुरुवातीस जानेवारी महिन्यापासून शिवाजी नाट्यगृह जवळ महिलांचे विविध प्रकारचे स्टॉल लावून त्यांना एक मंच उपलब्ध करून दिलेला होता . या माध्यमातून त्यांनी प्रत्येक भगिनीने आत्मनिर्भर व्हावे असा त्यांच्या उदात्त हेतू होता. त्यांनी शहरातील सर्व भगिनींना एकत्र आणून गृहिणी असतील तर त्यांनी त्या आपल्या आवडीच्या घरी जमेल ते पापड ,लोणचे, मिरची मसाले तयार करणे किंवा झुणका-भाकर ,पुरणपोळी ज्याला जे जे जमेल त्यां गृहिणींनी कपडे , चहा,भजी ,खाद्यपदार्थांचे स्टॉल आदि सामान असेल ते तयार करून ते विक्री साठी आणावे किंवा जे कलाकार असतील त्यांनी आपल्या कलाकुसरीच्या वस्तू मंचच्या स्टॉलमध्ये लावावे जेणेकरून नागरिकांना त्यांच्या कलेची जाणीव व्हावी व त्यांना प्रसिद्ध मिळावी. अमळनेर शहरातील भगिनींना काही आर्थिक लाभ मिळावा व कुटुंबाला मदत व्हावी हा उदात्त हेतू यामागे होता . ज्या युवतींना किंवा ज्या भगिनींना आपल्या कला सादर करावयाची असेल तर त्यांना नाट्य मंच सुद्धा उपलब्ध करून दिला होता जेणेकरून ते आपले नृत्य किंवा एकांकिका किंवा गायनाची आवड असेल तर गायन सुद्धा त्या सादर करू शकत होत्या. निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा आदी विषय त्यांनी त्या वेळोवेळी निवडलेले होत्या व स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य असे पारितोषिक सुद्धा मंचातर्फे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात येत असे. अमळनेर शहरात सांस्कृतिक वारसा सतत चालू राहावा या करता पायाला भिंगरी लावून त्या सतत स्वतः राबत असत व आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना सतत प्रेरणा देत असत कोणाला भेटायचे असेल किंवा कुठे कार्यक्रमाला जायचे असेल तर तर ते स्वतः कोणत्याही आडमुठेपणा न करता स्वतः कोणतेही काम करीत असत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठरविणे त्यांची राहण्याची नीट व्यवस्था करणे हे सुद्धा ते पार पडत. नवनवीन प्रयोग करत व आपल्या प्रचंड जनसंपर्कद्वारे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग या कार्यक्रमात व्हावा यासाठी कसोशीने प्रयत्न करीत.

*सर्व धर्म परिषद-२०२४*

जेव्हा माझ्याकडे डॉ.अपर्णा ताई मुठ्ठे व सौ वसुंधरा ताई लांडगे आल्या व म्हणाल्यात की आम्ही आपल्या अमळनेर महिला मंच तर्फे शहरात सर्व धर्म परिषद आयोजित करीत आहोत आपण आवर्जून उपस्थित रहावे असे त्यांनी मला विनंती वजा सूचना केल्यात ताईंच्या दरारा एवढा होता की नाही म्हणण्याची तिथे सोयच नव्हती .तेव्हा मी त्यांना विचारले हे कशाकरिता? तेव्हा डॉ. मुठ्ठे म्हणाल्यात की अमळनेर ही संत नगरी व साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या या शांतता प्रिय शहरात काही अप्रिय घटना घडलेल्या आहेत.अमळनेर शहर व परिसरात युवकांनी नागरिकांनी अलीकडच्या घटना पाहता कोणत्याही प्रकारच्या समाजात तणाव नसावा व सर्वधर्म भाव जपला जावा याकरता त्यांनी ही परिषद आयोजित केलेली होती आणि यासाठी त्यांनी सौ सरोज भांडारकर ,सौ कांचन शाह व सौ वसुंधरा लांडगे आदी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन यशस्वीरित्या पार पडले होते या सभेत त्यांनी हिंदू-मुस्लीम , जैन शीख, ख्रिश्चन, पारशी, सिंधी , बौद्ध आदी समाजाचे धर्मगुरूंना एकत्रित करून त्यांनी आपल्या धर्माची शिकवण बाबत योग्य उद्बबोधन करावे अशी विनंती केली व या विनंतीला मान देऊन सर्व धर्मगुरू उपस्थित राहिले होते. सुदैवाने मलाही दाऊदी बोहरा समाजातर्फे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली व मला सन्मानपूर्वक मंचावर बसविले व मलाही बोलण्याची संधी देण्यात आलेली होती.त्याबद्दल मी त्यांच्या सदैव ऋणी राहील .हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर रोल मॉडेल ठरावा असा अभूतपूर्व यशस्वी झालेला होता. डॉक्टर अर्पणाताई ८२वे वर्षी सुद्धा युवा वर्गाला लाजवेल असे उत्साहाने जोरदार काम करीत असे. त्या कधी थकल्या नाहीत की त्या कधी थांबल्या नाहीत.लोकांनी किती ही टीका टिप्पणी केली तरी आपल्या ध्येयापासून कधीही विचलित झाल्या नाहीत व समाजसेवेपासून कोणीही त्यांना परावृत्त करू शकले नाही.

*भिल्ल समाजाच्या मुलांसाठी रोटरी ॲन्स प्राथमिक शाळा*

सुमारे गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी अंमळनेरचे प्रख्यात बिल्डर प्रकाश भाऊ मुंदडे यांना विनंती करून भिल्ल वस्तीत त्यांच्या मुलांकरिता रोटरी क्लब अमळनेरच्या माध्यमातून रोटरी अँनस प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. भिल्ल समाजाची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी प्राथमिक शाळा तयार केली होती व ती आज तागायत त्यांचे प्रेरणेने व प्रयत्नाने चालू आहे हे विशेष.

*वैद्यकीय व्यवसायाचा उपयोग समाजसेवेसाठी*

डॉ. अपर्णा ताई या सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ होत्या त्यांचे पतीदेव स्वर्गवासी डॉ.चंद्रशेखर मुठ्ठे या दापत्यांनी अनेक सर्वसामान्य रुग्णांची अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा केलेली होती. दर आठवड्याला श्री संत सखाराम महाराजांच्या मठात व बहुउद्देशीय आधारसंस्थेच्या माध्यमातून खेडोपाडी जाऊन त्यांनी रुग्णसेवा केलेली होती.पती निवर्तल्या नंतर सुद्धा त्या डगमगल्या वा खचल्या नाहीत. उलट त्या सुपुत्र डॉ.राहुल , सुपुत्रि सुप्रसिद्ध रेकी मास्टर डॉ.गौरी जोशी (पुणे) व स्नुषा डॉ .बिराज यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्यात.संत तुकाराम महाराजांच्या वचना प्रमाणे
*शुद्ध बिजापोटी,
रसाळ गोमटी*
म्हणजे खाण तशी माती
आपल्या आई-बाबांप्रमाणे डॉ .राहुल मुठ्ठे व कुटुंबीयांनी समाजसेवेच्या वसा कायम ठेवत रोटरी क्लब अमळनेरच्या माध्यमातून व अनेक कॅम्पमधून गरजूंसाठी प्रसंगी विनामूल्य वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत आहेत.

आमच्या एव्हरग्रीन ग्रीन सिनिअर सिटीजन क्लबच्या त्या सक्रिय व उत्साही सदस्य
होत्या.प्रसंगी अनेक एकांकिकेत त्या सहभाग घेत व सर्वांना सहभागी होण्याकरिता प्रेरणा देत.तसेच अनेक संस्थांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभाग असे ब्राह्मण सेवा संघ ,श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पहाटे हास्य क्लब मध्ये त्यांच्या सहभाग असायचा, पोलीस दक्षता कमिटीत त्या नेहमी हजर असायचा, मॉर्निंग वॉक त्या नियमितपणे करीत असत. अशी बहु आयामी व्यक्तिमत्व असलेली ताई आई आज आपल्यात नाही याची खंत आपणाला वेळोवेळी जाणवेल .त्यांच्या अचानक जाण्याने अमळनेरच्या सांस्कृतिक, सामाजिक तसेच वैद्यकीय क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. मुठ्ठे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व अमळनेरकर सामील आहोत. परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो ही प्रभू चरणी प्रार्थना!

*हजारो साल नर्गिस अपने* बेनुरी पर रोती है !*
*तब जाकर होता है चमन* में एक दिदावर* पैदा ! ! *

शब्दाकंन

मकसूद बोहरी
अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *