शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई लढणारा नेता- प्रा. सुभाष पाटील
![]()
“ज्ञानयोगी ते जननेते : शिरूडच्या मातीतून उभा राहिलेला सेवाभावी ‘जिभाऊ’ प्रवास”
मातीचा सुगंध ज्यांच्या श्वासात आहे, शेतकऱ्यांच्या वेदना ज्यांच्या हृदयात आहेत आणि माणुसकी ज्यांच्या कृतीत आहे, असे अमळनेर तालुक्याचे लाडके नेतृत्व आदरणीय प्रा. सुभाष सुकलाल बाविस्कर (जिभाऊ) यांना ६३ व्या वाढदिवसानिमित्त मराठी लाईव्ह न्यूज परिवाराकडून कोटी कोटी प्रणाम व मनःपूर्वक शुभेच्छा!
शिरूडच्या पवित्र भूमीत जन्मलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे संघर्षातून घडलेले एक तेजस्वी उदाहरण आहे. बालपणीच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ज्योत मनात जपणारा तो ध्येयवेडा विद्यार्थी पुढे प्राध्यापक झाला; पण पद, प्रतिष्ठा आणि मानमरातब यापलीकडे जाऊन त्याने “माणूस” जपला. म्हणूनच जिभाऊ हे केवळ नाव नाही, तर हजारो कुटुंबांचा विश्वास आहे.
रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत अणू-रेणूंचे सूत्र उलगडताना त्यांनी जीवनाचेही सूत्र समजून घेतले—“परिवर्तन हेच शाश्वत.” हेच तत्त्व त्यांनी समाजकार्यात रुजवले. नल-जल योजनेद्वारे शिरूडला टँकरमुक्त करताना त्यांनी केवळ पाणी दिले नाही, तर आया-भगिनींच्या डोळ्यातील अश्रू पुसले. ग्रामविकास, सहकार चळवळ, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांना न्याय—या प्रत्येक आघाडीवर ते ठामपणे उभे राहिले.
याच उत्कृष्ट आणि निस्वार्थ कार्याची दखल मराठी लाईव्ह न्यूज या वैबपोर्टलने वेळोवेळी घेतली आहे. मराठी लाईव्ह न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी नेते प्रा. सुभाष पाटील (जिभाऊ) यांना “सन्मान कर्तुत्वाचा 2025” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल प्रदान करून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर शेतकरी, सामान्य नागरिक आणि समाजासाठी झटणाऱ्या एका जिवंत विचारधारेचा होता.
आजारी माणसाला सायकलवर बसवून दवाखान्यात नेणारा तो तरुण, पुढे मुंबईच्या मोठ्या रुग्णालयांत गरजूंना आधार देणारा “देवदूत” ठरला. सत्ता असो वा विरोध, जिभाऊंनी नेहमीच सत्याची बाजू घेतली. अन्यायाविरुद्धचा त्यांचा लढा आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीची त्यांची तळमळ हीच त्यांच्या आयुष्याची खरी ओळख आहे.
……..कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देतानाही दिवसाला शंभर फोन घेऊन लोकांची कामे मार्गी लावणारा हा ‘मृत्युंजय’ खऱ्या अर्थाने प्रेरणास्त्रोत आहे. त्यांच्या मागे सावलीसारखी उभी असलेली कुटुंबियांची साथ हेच त्यांच्या आयुष्याचे खरे वैभव आहे.
जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन “माणूस आणि त्याची गरज” हेच तत्व त्यांनी आयुष्यभर जपले. तरुणांना शेतीशी नाळ जोडण्याचा संदेश देत, स्त्रीशिक्षण आणि सामाजिक एकात्मतेचा विचार पुढे नेत ते आजही समाजाला दिशा देत आहेत.
आदरणीय जिभाऊ,
आपल्या या अथक, निस्वार्थ आणि प्रेरणादायी प्रवासाला आई तुळजाभवानीचे मंगल आशीर्वाद लाभोत. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड ऊर्जेने आपण असेच जनसेवेचा दीप प्रज्वलित ठेवावा, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
आपला जीवनप्रवास येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी दीपस्तंभ ठरो…
🌹 जिभाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
शुभेच्छुक :
ईश्वर महाजन
पत्रकार, अमळनेर
मो. ९८६०३५२९६०

