माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोनासह मूल्यसंवर्धनाचा संदेश
1 min read

माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोनासह मूल्यसंवर्धनाचा संदेश

Loading

माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा; वैज्ञानिक दृष्टिकोनासह मूल्यसंवर्धनाचा संदेश

अमळनेर प्रतिनिधी
ढेकू खुर्द : आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय ढेकू खुर्द येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विज्ञानप्रेम, जिज्ञासा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षक श्री. दिनेश पाटील सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मूल्यवर्धनचे जिल्हा समन्वयक श्री. जयेश माळी सर तसेच तालुका समन्वयक सौ. प्रगती माळी मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुबोध व प्रभावी सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक श्री. एस. आर. सोनवणे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या कार्याचा गौरव करत मनोगते व्यक्त केली. इयत्ता नववीच्या कु. हर्षा, नेहा व पूजा तसेच इयत्ता सातवीच्या दिव्या, कल्याणी व प्रियंका यांनी रमण यांच्या संशोधनकार्याची माहिती देत त्यांच्या वैज्ञानिक योगदानाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या ओघवत्या सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
प्रमुख पाहुणे श्री. जयेश माळी सर यांनी दैनंदिन जीवनातील साध्या-सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा याचे मार्गदर्शन केले. “आपल्या सभोवताल घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागचे कारण शोधणे, प्रश्न विचारणे आणि तर्कशुद्ध विचार करणे हाच खरा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे,” असे सांगत त्यांनी विज्ञानासोबत मूल्यांची जोड देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढवण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात विज्ञान शिक्षक श्री. दिनेश पाटील यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व स्पष्ट करत अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टी ठेवून भविष्यात संशोधन क्षेत्रात पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले.
शेवटी श्री. एस. आर. सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध जीवनमूल्ये अंगीकारावीत, असे सांगून कार्यक्रमाचा समारोप केला.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. एच. पाटील सर, श्री. शैलेश पाटील, श्री. दीपक शिंदे, श्री. राकेश कोळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. एन. एल. नायदे, श्री. पी. आर. पाटील, श्री. संदीप पाटील, श्री. दीपक येवले उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी नवचैतन्य निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *