शिक्षक ते इंटरनॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील सरांचा सह्याद्रीत झंझावाती पराक्रम!
1 min read

शिक्षक ते इंटरनॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील सरांचा सह्याद्रीत झंझावाती पराक्रम!

Loading

शिक्षक ते इंटरनॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील सरांचा सह्याद्रीत झंझावाती पराक्रम!

अमळनेर प्रतिनिधी :
जिद्द, चिकाटी आणि अविरत मेहनतीच्या बळावर स्वप्न साकार करता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिखर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक अँड. चंद्रभान पाटील सर. टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, लोणावळा येथील ५० किलोमीटरचे अत्यंत आव्हानात्मक अंतर त्यांनी अवघ्या ५ तासांत पूर्ण करून अमळनेरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे.
सह्याद्री पर्वतरांगांतील उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या आणि कठीण टेकड्यांमधून जाणारी ही मॅरेथॉन आशिया खंडातील प्रतिष्ठित स्पर्धांपैकी एक मानली जाते. या कठीण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अमळनेरचा पहिला अल्ट्रा रनर तसेच वेगवान धावपटू होण्याचा मान पाटील सरांनी पटकावला आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या एका वर्षात त्यांनी सामान्य धावपटूपासून अल्ट्रा रनर होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला. यापूर्वी त्यांनी ४२ किमीची मॅरेथॉन ३ तास ५५ मिनिटांत, तर २१ किमीच्या सात मॅरेथॉन पूर्ण करताना सर्वोत्तम वेळ १ तास ४२ मिनिटे अशी नोंदवली आहे.
त्यांच्या या दमदार कामगिरीमुळे त्यांना दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठित कॉम्रेड मॅरेथॉनसाठी पात्रता मिळाली आहे, ही अमळनेरसाठी अभिमानाची बाब आहे. एवढ्यावरच न थांबता, नोव्हेंबर २०२६ मध्ये राजस्थानमध्ये होणाऱ्या १०० किमी बॉर्डर रन स्पर्धेतही सहभागी होण्याचा त्यांचा निर्धार आहे.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना यशाची दिशा दाखवणारे पाटील सर आता क्रीडाक्षेत्रातही प्रेरणादायी ठरत आहेत. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारे हे व्यक्तिमत्त्व आज स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर इंटरनॅशनल रनर बनण्याच्या दिशेने झेपावत आहे.
अमळनेरच्या क्रीडा इतिहासात नवे पर्व सुरू करणाऱ्या अँड. चंद्रभान पाटील सरांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *