ग्रामीण मातीतल्या अनुराग जगदाळेची “जब्राट” चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री!
1 min read

ग्रामीण मातीतल्या अनुराग जगदाळेची “जब्राट” चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री!

Loading

 

ग्रामीण मातीतल्या अनुराग जगदाळेची “जब्राट” चित्रपटाद्वारे पार्श्वगायक म्हणून मराठी सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री!

‘जब्राट’ हा मराठी चित्रपट २० फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून त्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शिका मा.प्रगती कोळगे नुकत्याच जळगाव व धुळे दौऱ्यावर येऊन गेल्यात. दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह, धुळे येथील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झेड.बी. पाटील महाविद्यालयासही त्यांनी भेट दिली.

दरम्यान जयहिंदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळासह प्राचार्य, प्राध्यापक वृंद व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशीही त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी दिग्दर्शिका प्रगती कोळगे, गायक अनुराग जगदाळे, अभिनेता राहुल चव्हाण, अभिनेत्री आयली घिया आदींचा जयहिंद संस्थेसह झेडबी पाटील महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. प्रा.भगवान जगदाळे यांनीही जयहिंदचे पदाधिकारी, प्राध्यापक वृंद यांच्यासह टीम ‘जब्राट’चा मातोश्री सेवाभावी संस्था व जगदाळे परिवारातर्फे भारताचे संविधान, फुले चरित्र व “आरंभ या जीवनाचा” हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह आदी ग्रंथ भेट देऊन मान्यवरांचा सन्मान केला.

सदर चित्रपटात नवोदित गायक अनुराग जगदाळे यास दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी पार्श्वगायनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. अनुराग जगदाळे हा धुळे येथील जयहिंद अर्थात झेड.बी.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे या ग्रामीण भागातून पुढे आलेला कलावंत आहे. शालेय शिक्षण सुरु असतानाच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अनुरागने संगीत विशारद पदवी प्रथम श्रेणीत संपादित केली आहे. बालपणीच अनुरागचे मातृछत्र हरपले. पण अशा परिस्थितीतही अनुरागने हिम्मत न हारता वडिलांसह संयुक्त कुटुंबाच्या पाठबळावर संघर्ष करत स्वतःच्या जिद्द व मेहनतीने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. ‘सारेगमप’ व ‘संगीत सम्राट’चे ऑडिशन्स देखील अनुरागने यापूर्वी दिले होते.

गायक अनुरागच्या आग्रहास्तव निर्मात्या, दिग्दर्शिका तथा गीतकार प्रगती कोळगे या धुळे दौऱ्यावर आल्या होत्या. दरम्यान धुळे जिल्हा पत्रकार भवनात त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी डॉ.मोहन मोरे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी टीम ‘जब्राट’ने पत्रकारांशी संवाद साधून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. ‘जब्राट’ हा चित्रपट महाराष्ट्रासह धुळ्याच्या ज्योती टॉकीजमध्ये, तर नंदुरबारच्या मिराज मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये २० फेब्रुवारीपासून प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटास संगीतकार डॉ.जयभीम शिंदे यांनी संगीत दिले आहे. पार्श्वगायिका बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे, नंदिश उमप आदी दिग्गज गायकांची गाणीही या चित्रपटात ऐकायला मिळतील. अनिलकुमार अरोडा, गोविंद मोदी हे अनुक्रमे कार्यकारी व सहनिर्माते आहेत. अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे ही जोडी रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे.

२० फेब्रुवारीपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉलेज विश्वातल्या दुनियादारीच्या मनोरंजक गोष्टी या चित्रपटातून बघावयास मिळणार आहेत. वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ.ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट हे कलावंत देखील या चित्रपटात आहेत. तसेच संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, गणेश यादव ही ज्येष्ठ मंडळी देखील आपल्याला या चित्रपटातून दिसणार आहेत.

निर्मात्या, दिग्दर्शिका, पटकथा लेखिका, गीतकार अशा अष्टपैलू प्रगती कोळगे ह्या मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील मूळ राहिवासी असून सद्या अमेरिकेतील अटलांटा येथे आयटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. धुळे जिल्ह्यासह खान्देश व उत्तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट बघावा असे आवाहन दिग्दर्शिका प्रगती कोळगे व पार्श्वगायक अनुराग जगदाळे यांनी केले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *