नगाव व गडखांब येथे शिवजयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांच्या शिवचरित्रावरील प्रभावी सादरीकरणाला दाद
![]()
नगाव व गडखांब येथे शिवजयंती उत्साहात साजरी
विद्यार्थ्यांच्या शिवचरित्रावरील प्रभावी सादरीकरणाला दाद
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
सुयोग शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने नगाव व गडखांब येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी केली.
सुरुवातीला गडखांब ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. शिवचरित्राचा जागर आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणाऱ्या विचारांनी परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नगाव येथे हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी परफॉर्मन्स सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाट्यरूपक, पोवाडे आणि देशभक्तीपर सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या अभिनयातील जोश, संवादफेक आणि इतिहासाची अचूक मांडणी यामुळे कार्यक्रमाला विशेष रंग चढला.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय सादरीकरणाचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मंडळांनी मनापासून कौतुक केले. हिंदू सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सदस्य यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी नगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक दादासाहेब तुषार बोरसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राविषयी अभिमान व प्रेरणा निर्माण झाली.
शिवजयंती निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थ तरुण मंडळ, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि शिवजयंतीचा उत्सव प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

