महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे
1 min read

महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे

Loading

*महाराष्ट्र राज्य आजही शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून – *वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे*

जळगाव दि. १९ – राज्य मिळवणे सोपे असते; मात्र ते टिकवणे अत्यंत कठीण असते. आजपर्यंत महाराष्ट्र राज्य शिवरायांच्या विचारांमुळेच टिकून असल्याचे प्रतिपादन वस्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या विद्यमाने, संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित शिवजयंती उत्सव निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री सावकारे बोलत होते.

यावेळी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी,अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश चौधरी उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, शंभू पाटील,राम पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

वस्रोद्योग मंत्री श्री सावकारे म्हणाले,शिवरायांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे आदर्श आचरणात आणणे हीच खरी कृतज्ञता असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आदर केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण भारतात त्यांना पूज्य मानले जाते. ज्या देवाला आपण पाहिले नाही, त्याची आपण पूजा करतो; परंतु शिवरायांनी प्रत्यक्ष कृतीतून स्वराज्याची संकल्पना साकार करून जनतेला स्वाभिमान दिला. त्यामुळे ते देवपुरुषच आहेत आणि त्यांच्या विचारांमुळेच देश आज एकसंघ राहिला आहे,असे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात, शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंभू पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *