“माझा संकल्प – भूमी सुपोषण” जनजागर शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरतर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय
![]()
“माझा संकल्प – भूमी सुपोषण” जनजागर शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरतर्फे विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप; सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय
अमळनेर प्रतिनिधी :
मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या वतीने आयोजित “माझा संकल्प – भूमी सुपोषण चळवळ” या जनजागृतीपर भव्य शोभायात्रेला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरण संवर्धन, भूमी सुपोषण आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणाऱ्या या शोभायात्रेत अमळनेर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वाडी चौक येथून सुरू झालेली ही शोभायात्रा अमळनेर शहराच्या मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत मंगळ ग्रह येथे पोहोचली. विद्यार्थ्यांच्या घोषणाबाजी, फलक आणि संदेशांमुळे संपूर्ण परिसरात पर्यावरण जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर यांच्या माध्यमातून सहभागी शालेय विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या जायन्ट्स ग्रुपने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला.
या प्रसंगी जायन्ट्स ग्रुपचे नवनिर्वाचित युनिट ऑफिसर डॉ. सुनील पाटील, नवनियुक्त अध्यक्ष डॉ. महेश पाटील, मार्गदर्शक प्रा. पी. आर. भावसार सर, प्रा. यू. जी. देशपांडे सर, उपाध्यक्ष राजेंद्र भावसार सर, सचिव संदीप महाजन सर, खजिनदार राजेंद्र पाटील सर, सदस्य संतोष वाघ, महेश पाटील, व्यावसायिक श्रीकांत जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर उपक्रमासाठी अध्यक्ष डॉ. महेश पाटील यांचे विशेष सौजन्य लाभले. सामाजिक जाणीव जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित या शोभायात्रेमुळे “भूमी सुपोषण” या संकल्पनेबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला असून, अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

