सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘सुखमणी’ उपसेवा केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम  परमात्म्याची ओळख, शिवरात्रीचे महत्त्व व ‘सुवर्ण भारत’ संकल्पनेवर मार्गदर्शन
1 min read

सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘सुखमणी’ उपसेवा केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम परमात्म्याची ओळख, शिवरात्रीचे महत्त्व व ‘सुवर्ण भारत’ संकल्पनेवर मार्गदर्शन

Loading

सेवानिवृत्त सैनिकांसाठी ‘सुखमणी’ उपसेवा केंद्राचा प्रेरणादायी उपक्रम

परमात्म्याची ओळख, शिवरात्रीचे महत्त्व व ‘सुवर्ण भारत’ संकल्पनेवर मार्गदर्शन

परभणी प्रतिनिधी :
फरांदे पार्क येथील ‘सुखमणी’ उपसेवा केंद्राच्या वतीने सेवानिवृत्त सैनिकांसाठी आयोजित करण्यात आलेला विशेष मार्गदर्शन वर्ग उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सेवानिवृत्त सैनिकांसाठी विशेष क्लास घेण्याच्या सूचनेनंतर केंद्राच्या संचालिका राजयोगिनी अनिता बहेनजी आणि राजयोगिनी सत्या बहेनजी यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला.
या विशेष सत्रामध्ये बहिणींनी सैनिकांना परमात्म्याची ओळख करून देत आत्मिक शक्ती, मनःशांती आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व पटवून दिले. भारताचा गौरव म्हणजे परमात्म्याची निवड असलेला देश, असा संदेश देत ‘सुवर्ण भारत’ घडविण्याची संकल्पना त्यांनी मांडली. देश समृद्ध व शांततामय करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका पार पाडावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
शिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगताना, जसे भारताचे सैनिक सीमेवर देशाचे रक्षण करतात, तसेच ब्रह्माकुमारी संस्था आध्यात्मिक योद्धा बनून दैवी गुणांचे रक्षण करते, अशी प्रभावी उपमा देण्यात आली. “सैनिक ही देशाची अमूल्य संपत्ती आहे; त्यांच्या बलिदानाचे स्मरण भारत कधीही विसरू शकत नाही,” अशा शब्दांत सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
परमात्म्याने भारताची निवड केली आहे, त्यामुळे आपण या देशाचे नागरिक आहोत याचा अभिमान बाळगून राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. ब्रह्माकुमारींच्या एकोणवीस सेवा विंग विविध क्षेत्रांत कार्यरत असून शांतता प्रस्थापित करण्यात त्या यशस्वी ठरत आहेत, याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमास कर्पफचे प्रभारी अधिकारी जी. रुषी केशवन, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय शाम सावळे, दंत अधिकारी डॉ. प्रियांका गणपतराव अवसरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली.
देशसेवेतील योगदानानंतरही आत्मिक बळ व सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी असा मार्गदर्शनपर उपक्रम सैनिकांसाठी उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. प्रेरणादायी संदेशांनी भारलेला हा कार्यक्रम समाधानकारक वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *