अष्टविनायक नगरात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या दमदार शिवशायरीने अमळनेर दुमदुमले; पैठणी लकी ड्रॉने वाढवली रंगत
![]()
अष्टविनायक नगरात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
शिवशाहीर स्वप्निल डुंबरे यांच्या दमदार शिवशायरीने अमळनेर दुमदुमले; पैठणी लकी ड्रॉने वाढवली रंगत
अमळनेर प्रतिनिधी :
अष्टविनायक नगर, अमळनेर येथे मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आलेला शिवजन्मोत्सव सोहळा 2026 अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा वाढवली.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व देश-विदेशात आपल्या कलेचा ठसा उमटविणारे शिवशाहीर मा. श्री. स्वप्निलजी डुंबरे व त्यांच्या संपूर्ण टीमने सादर केलेल्या शिवशायरी आणि पोवाड्यांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, स्वराज्याची प्रेरणादायी कथा आणि पराक्रमाचे जाज्वल्य वर्णन यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. प्रत्येक पोवाड्यानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेला लकी ड्रॉ देखील मोठ्या उत्सुकतेत पार पडला. उपस्थित प्रेक्षकांमधून 5 भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना आकर्षक पैठणी साडी भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे कार्यक्रमात आणखी रंगत निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. अमोल पाटील, पराग चौधरी, राजेंद्र पाटील, दीपक बेलदार, नंदलाल पाटील, नगरसेवक सचिन बळवंत पाटील, क्षितिज महाजन तसेच लाठीकाठी प्रशिक्षण देणारे गीते सर यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
अष्टविनायक नगरात पार पडलेल्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याने अमळनेरकरांच्या मनात शिवभक्तीची नवी चेतना निर्माण केली असून, छत्रपतींच्या विचारांचा जागर कायम ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

