सार्वजनिक ग्रंथालय टिटवीला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्काराचा मान नाशिक विभागीय अधिवेशनात सन्मान; ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय योगदानाची दखल
![]()
सार्वजनिक ग्रंथालय टिटवीला ‘उत्कृष्ट ग्रंथालय’ पुरस्काराचा मान
नाशिक विभागीय अधिवेशनात सन्मान; ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय योगदानाची दखल
पारोळा प्रतिनिधी
कै. उत्तम नामदेव पाटील सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय, टिटवी (ता. पारोळा, जि. जळगाव) या संस्थेला ‘उत्कृष्ट ग्रंथालय गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नाशिक विभाग ग्रंथालय संघ, नाशिक व जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २२ वे विभागीय अधिवेशन रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी पारोळा येथील भाटेवाडी येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात टिटवी सार्वजनिक ग्रंथालयाच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने केलेले प्रयत्न, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी घेतलेले विविध उपक्रम आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवण्याची धडपड याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक मा. अशोकजी गाडेकर साहेब, राज्य ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष मा. गजानन कोठेवार, पारोळा नगरीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष मा. चंद्रकांत पाटील तसेच मराठवाडा विभागाचे ग्रंथालय अधिकारी मा. बाविस्कर साहेब यांच्या हस्ते ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रंथालयाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पारोळा मतदारसंघाचे आमदार मा. अमोलजी पाटील यांनी संस्थेचे अभिनंदन करून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि वाचकांसाठी ग्रंथालयाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद केले. संस्थेने भविष्यातही अशीच उत्कृष्ट भरारी घ्यावी, यासाठी त्यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.
या सन्मानामुळे टिटवी सार्वजनिक ग्रंथालयाच्या कार्याला नवे बळ मिळाले असून, ग्रामीण भागात वाचन संस्कृतीची ज्योत अधिक तेजाने प्रज्वलित राहणार आहे.

