मंगळसूत्र’ वर्गाबाहेर आणि परीक्षार्थी तणावात; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकारामुळे संताप, सखोल चौकशीचे आदेश.
![]()
‘मंगळसूत्र’ वर्गाबाहेर आणि परीक्षार्थी तणावात; छत्रपती संभाजीनगरमधील प्रकारामुळे संताप, सखोल चौकशीचे आदेश.
(विशेष प्रतिनिधी: उदय नरे)
छत्रपती संभाजी नगर: राज्यभरात सुरू असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (CTET) छत्रपती संभाजीनगरसह अनेक केंद्रांवर महिला परीक्षार्थींना अपमानस्पद वागणुकीला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेच्या नियमांचा हवाला देत विवाहित महिलांना त्यांचे मंगळसूत्र, नाकातील दागिने आणि इतर धातूच्या वस्तू केंद्राबाहेर काढायला लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या संवेदनशील प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
सुरक्षेचा नियम की धार्मिक भावनांचा अपमान?
हिंदू धर्मात मंगळसूत्र हे केवळ दागिना नसून ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. मात्र, “धातू” सोबत नेण्यास मनाई असल्याच्या तांत्रिक नियमाचा आधार घेत परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी महिलांना मंगळसूत्र काढण्याची सक्ती केली. यामुळे अनेक महिला परीक्षार्थींच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, समाजमाध्यमांतून यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लाखो रुपयांचे दागिने वाऱ्यावर; परीक्षार्थींच्या मानसिकतेचे काय?
या घटनेचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न.
सुरक्षेचा अभाव: आज सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना, दोन-तीन तोळ्यांचे मंगळसूत्र (ज्याची किंमत ३ लाखांहून अधिक असू शकते) शाळेच्या बाहेर किंवा बाकड्यावर ठेवणे किती सुरक्षित आहे?
जबाबदारी कोणाची?: जर एखादा दागिना चोरीला गेला असता किंवा गहाळ झाला असता, तर त्याची जबाबदारी परीक्षा केंद्र चालकांनी घेतली असती का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
मानसिक छळ: शिक्षक म्हणून पात्रता सिद्ध करण्यासाठी आलेल्या या परीक्षार्थींना लाखो रुपयांचे दागिने बाहेर सोडून वर्गात पेपर लिहिताना किती मानसिक त्रास झाला असेल, याची कल्पनाच केलेली बरी. “माझे दागिने सुरक्षित असतील का?” याच विचारात परीक्षार्थींचे लक्ष पेपरपेक्षा बाहेर अधिक होते, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
’दबावाखाली’ शिक्षक; प्रशासनाचे चौकशीचे आश्वासन
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शिक्षक हे स्वतः परीक्षार्थी असल्याने आणि करिअरवर परिणाम होईल या भीतीने प्रसारमाध्यमांशी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. मात्र, हा प्रकार केवळ एका केंद्रापुरता मर्यादित नसून राज्याच्या इतर भागांतही घडल्याचे समोर येत आहे.
”या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
परीक्षा केंद्रांवर शिस्त आवश्यक असली तरी, ती राबवताना मानवी मूल्ये आणि महिलांच्या भावनांचा विचार का केला गेला नाही? तसेच मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लॉकर किंवा टोकन सिस्टीम सारखी कोणतीही व्यवस्था नसताना अशा प्रकारची सक्ती करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुंबईचे माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील शिक्षकांनी शिक्षकांचा सन्मान झाला पाहिजे अशी भावना आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.

