हळव्या मनाचा नेता : अभिलाषा रोकडे यांनी उलगडली अजितदादांच्या मायेची आठवण
1 min read

हळव्या मनाचा नेता : अभिलाषा रोकडे यांनी उलगडली अजितदादांच्या मायेची आठवण

Loading

हळव्या मनाचा नेता : अभिलाषा रोकडे यांनी उलगडली अजितदादांच्या मायेची आठवण

कडक निर्णयक्षमतेसोबतच कार्यकर्त्यांवर पितृतुल्य प्रेम करणारा नेता म्हणून अजित पवार यांची भावनिक आठवण

चाळीसगाव प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उत्तर महाराष्ट्र युवती अध्यक्ष अभिलाषा रोकडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा एक हळवा, भावनिक प्रसंग सांगत त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकीचा पैलू उजागर केला.
अभिलाषा रोकडे सांगतात, “मी पहिल्यांदाच मुंबईला गेले होते. त्याच काळात माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली गेली होती. पक्ष संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले. बैठकीनंतर अजितदादांना भेटायचे ठरवले आणि देवगिरी बंगल्यावर पोहोचले. तिथे अफाट गर्दी होती. मोठे नेते, अधिकारी, कार्यकर्ते यांची वर्दळ पाहून मनात भीती निर्माण झाली.”

त्या पुढे म्हणाल्या, “मी आत गेले तेव्हा अजितदादा एका अधिकाऱ्यावर नाराज होते. ‘हे काम चुकीचं केलं आहे. असं काम कोणी करतं का?’ असा त्यांचा कडक आवाज ऐकून मी काहीशी घाबरले. वातावरण तणावपूर्ण होते. तेवढ्यात दादांची नजर माझ्याकडे गेली. ते क्षणात थांबले आणि अगदी आपुलकीने म्हणाले, ‘तुम्ही रडू नका. त्यांनी चुकीचं काम केलं म्हणून मी चिडलो आहे, तुमच्यावर नाही.’”

हा क्षण आजही त्यांच्या मनात कोरलेला आहे.

यानंतर दादांनी अत्यंत साधेपणाने विचारपूस सुरू केली. “तुम्ही कुठून आलात?”
“जळगाव,” असे उत्तर दिल्यावर त्यांनी पुढचा प्रश्न केला, “कशा आलात? काही खाल्लं आहे का? कुठे थांबल्या आहात?”

अभिलाषा रोकडे म्हणतात, “मी सांगितलं की अजून काही खाल्लेलं नाही. तेव्हा दादांनी तातडीने सुमित्रा पवार यांना सांगितलं, ‘आपल्या छोट्या ताईला आधी जेवायला घाला.’ त्या एका वाक्यातील माया, काळजी आणि आपुलकी माझ्यासाठी आयुष्यभराची आठवण ठरली.”

त्या पुढे भावुक होत म्हणाल्या, “राजकारणात कठोर निर्णय घेणारा नेता म्हणून त्यांची ओळख असली, तरी कार्यकर्त्यांच्या भावनांची जाण असलेला, त्यांच्या भुकेची, प्रवासाची, थकव्याची काळजी घेणारा ‘माणूस’ दादांमध्ये आहे. ‘काही खाल्लं आहे का?’ हा त्यांचा साधा प्रश्न माझ्यासाठी मोठा आधार ठरला.”

अभिलाषा रोकडे यांच्या या आठवणीमधून अजितदादा पवार यांचा एक वेगळाच, हळवा आणि माणुसकीने ओथंबलेला चेहरा समोर येतो — कडक प्रशासक आणि तितकाच जिव्हाळ्याचा नेता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *