जळोद–गांधली मुख्य पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा ठप्प
1 min read

जळोद–गांधली मुख्य पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा ठप्प

Loading

 


जळोद–गांधली मुख्य पाईपलाईन फुटली; अमळनेरचा पाणीपुरवठा ठप्प

अमळनेर  प्रतिनिधी
शहराला पाणीपुरवठा करणारी जळोद–गांधली येथील मुख्य जलवाहिनी अचानक फुटल्याने मंगळवारी अमळनेर शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला. पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असून अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहिला.

घटनेची माहिती मिळताच नगर परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेतली. दुरुस्तीकरिता आवश्यक जॉईंट व क्लॅम्प मालेगाव येथून मागवण्यात आले असून मशीनरीही घटनास्थळी पोहोचवण्यात आली आहे. पाईपलाईन अतिशय जीर्ण झाल्याने जनरेटरच्या सहाय्याने पाईप कट करून नवीन जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

“कोणत्याही परिस्थितीत आज रात्रीपर्यंत दुरुस्ती पूर्ण करून टाकी भरली जाईल आणि पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल,” अशी माहिती पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनी दिली.

दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्याधिकारी गणेश शिंदे व पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांनी नागरिकांची माफी मागत सहकार्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *