देवगाव देवळीतील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सिकलसेल तपासणी
![]()
देवगाव देवळीतील महात्मा फुले हायस्कूलमध्ये सिकलसेल तपासणी
अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनाच्या दृष्टीने सिकलसेल तपासणी व जनजागृती शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले. ग्रामीण भागात सिकलसेल आजाराबाबत जागरूकता वाढावी आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. रिजवान शेख (ढेकू खुर्द) यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेल आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. सिकलसेल म्हणजे काय, त्याची लक्षणे, आजार कसा ओळखावा, योग्य वेळी तपासणीचे महत्त्व, तसेच उपचार आणि काळजी याबाबत त्यांनी सोप्या व समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांची सिकलसेल संदर्भातील आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, पालकांपर्यंतही या विषयाची माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला सोनल संदानशिव, रमण अहिरे, सौ. उज्वला अरुण पाटील (आशा स्वयंसेविका), सौ. उज्वला विश्वास पाटील (अंगणवाडी सेविका, देवगाव) आदींची उपस्थिती होती.
लसीकरण व आरोग्य तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी केले. तसेच आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी यांसह शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी शाळेने उचललेले पाऊल कौतुकास्पद ठरत असून, अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन भविष्यातही व्हावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

