सलग सहाव्या विजयाबद्दल डॉ. जयाजी नाथ यांचा उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीकडून भव्य सत्कार
![]()
सलग सहाव्या विजयाबद्दल डॉ. जयाजी नाथ यांचा उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीकडून भव्य सत्कार
अमळनेर प्रतिनिधी —
नवी मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा विजयी होत लोकांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करणारे अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ साहेब यांचा उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी डॉ. जयाजी नाथ यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्क, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि समाजहिताच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या नेतृत्वामुळे नाथपंथी समाजासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, सामाजिक एकात्मतेसाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास महाराष्ट्र सचिव योगेश बर्वे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल कानडे, नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रोहित कानडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा शोभाताई शिंदे, महासंघ जिल्हाध्यक्ष बाळाकृष्ण जाधव, जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष शुभम बुवा, संगमनेर तालुका महिला अध्यक्षा रूपाली आहेरकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काशीनाथ वरपे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सत्कार समारंभात डॉ. जयाजी नाथ यांनी उपस्थितांचे आभार मानत, “जनतेने दिलेला हा विश्वास माझ्यासाठी जबाबदारी आहे. समाजहित आणि विकासाच्या कामात अधिक जोमाने कार्य करत राहीन,” असे आश्वासन दिले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी डॉ. जयाजी नाथ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

