मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची नियुक्ती
1 min read

मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची नियुक्ती

Loading

मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात तज्ज्ञ मार्गदर्शकपदी कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची नियुक्ती

एरंडोल प्रतिनिधी):
एरंडोल येथील ख्यातनाम कवी व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा. ना. आंधळे यांची मध्यप्रदेश मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने मराठी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र काही दिवसांपूर्वीच त्यांना प्राप्त झाले असून, मराठी विषयाच्या पाच दिवसीय कार्यशाळेतही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. त्यांच्या दीर्घ साहित्यसेवेचा आणि अध्यापन क्षेत्रातील भरीव योगदानाचा हा मानाचा गौरव मानला जात आहे.
प्रा. आंधळे यांनी वरिष्ठ महाविद्यालयात तब्बल पस्तीस वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सातत्याने काव्यलेखन व प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या साहित्यिक वाटचालीतील एक मैलाचा दगड ठरलेली ‘आई! मला जन्म घेऊ दे!’ ही प्रबोधनपर कविता इंग्रजीसह तब्बल पंचेचाळीस भारतीय प्रमाण व बोलीभाषांमध्ये अनुवादित झाली आहे. या कवितेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद त्यांच्या लेखनाची प्रभावीता अधोरेखित करतो. ही कविता सातासमुद्रापार पोहोचल्याचे मोठे यश त्यांच्या नावावर जमा झाले आहे.
त्यांच्या कविता महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यांतील शालेय ते विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत. राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद व उद्घाटकपद भूषविण्याचा सन्मानही त्यांना लाभला आहे. त्यांच्या ‘फर्मान आणि इतर कविता’ या काव्यसंग्रहावर महाराष्ट्रातील चाळीस नामवंत समीक्षकांनी समीक्षा लेखन केले आहे, जे त्यांच्या साहित्यिक उंचीचे द्योतक आहे.
प्रा. आंधळे यांनी पन्नास विविध साहित्यकृतींना प्रस्तावना लेखन केले असून त्या सर्व प्रस्तावनांचा संग्रह ‘शब्दशिवार’ या शीर्षकाने पुस्तकरूपात प्रकाशित झाला आहे. अनुवाद क्षेत्रातही त्यांचे कार्य भरीव आहे. मानवतावादी विचारवंत व कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे यांच्या ‘बा, तथागता!’ या अडीचशे पानी मराठी महाकाव्याचा त्यांनी अहिराणी बोलीत अनुवाद करून त्यावरील समीक्षा ग्रंथाचे संपादनही केले आहे.
अनुष्टुभ, अस्मितांदर्श, शब्दालय, अक्षरवैदर्भी, मिळून साऱ्या जणी, मनोहर, किशोर, उगवाई, किर्लोस्कर, लोकप्रभा, कविताश्री, अधिष्ठान, वसंत अशा नामांकित वाङ्मयीन मासिकांसह पाचशेहून अधिक दिवाळी अंकांत त्यांची कविता प्रकाशित झाली आहे. मराठी व हिंदी दूरदर्शन मालिकांसाठी शीर्षकगीत लेखनाचाही त्यांचा यशस्वी प्रवास आहे.
साहित्य, अध्यापन आणि अनुवाद या सर्व क्षेत्रांतील त्यांच्या बहुआयामी कार्यामुळेच मध्यप्रदेश अभ्यास मंडळाने त्यांना हा मानाचा सन्मान दिल्याची भावना व्यक्त होत आहे. या नियुक्तीबद्दल प्रा. आंधळे यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *