प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे धरणे; मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
1 min read

प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे धरणे; मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Loading

प्रजासत्ताक दिनी आशा सेविकांचे धरणे; मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

जळगाव प्रतिनिधी :
जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने अपेक्षित गांभीर्याने लक्ष न दिल्याने प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. निवेदन स्वीकारण्यासाठी जबाबदार अधिकारी न थांबल्यामुळे आशा सेविकांमध्ये नाराजीची भावना व्यक्त करण्यात आली.

मा. संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), मुंबई यांच्या आदेशानुसार जननी सुरक्षा योजनेच्या सन 2023 पासूनच्या थकीत मोबदल्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच मा. आयुक्त, कुटुंब कल्याण तथा संचालक एनएचएम, आरोग्य भवन, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्यालयातील आशा स्वयंसेविकांनी केलेल्या आरोग्यवर्धिनी कामांची तपासणी करून त्यांचा मोबदला अदा करावा, अशीही मागणी आहे.
वाघळी, तरवाडे, पातोंडा (चाळीसगाव), वरखेडी (पाचोरा) आणि गिरड (भडगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आशा सेविकांच्या व्हाउचरसोबत जिओ-टॅग फोटो प्रिंट जोडण्याची अट रद्द करून मोबदला द्यावा, अशी मागणीही आंदोलनात मांडण्यात आली. शासन नियमानुसार आशा सेविकांना रजेची तरतूद नसताना बाहेरगावी जाण्यासाठी नियमबाह्य रजेचे अर्ज घेण्याची पद्धत बंद करावी, अशीही भूमिका व्यक्त करण्यात आली.

या सर्व प्रश्नांच्या संदर्भात दि. १७ जानेवारी २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना नोटीस देऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे तीनशेपेक्षा अधिक आशा सेविकांनी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत युनियनचे रामकृष्ण बी. पाटील आणि श्रीमती कल्पना भोई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. निवेदन स्वीकारण्यासाठी अधिकारी उपलब्ध न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आशा स्वयंसेविकांचे प्रश्न येत्या पंधरा दिवसांत न सोडविल्यास फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील आशा सेविका बेमुदत कामबंद आंदोलन करतील, असा इशारा रामकृष्ण बी. पाटील यांनी दिला आहे.
सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी श्रीमती कल्पना भोई, सुनंदा पाटील, सुनंदा हडपे, वंदना पाटील, भारती नेमाडे, नम्रता पाटील, रविशा मोरे, उषा मोरे, भारती तायडे, आशा पोहेकर, भारती चौधरी, संगीता देवरे आदींनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *