जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक जनजागृतीचे प्रेरणादायी सत्र”
1 min read

जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक जनजागृतीचे प्रेरणादायी सत्र”

Loading

“जळगाव जनता सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक जनजागृतीचे प्रेरणादायी सत्र”

अमळनेर प्रतिनिधी :
दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमळनेर येथे जळगाव जनता सहकारी बँक व मिल के चलो असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने माहितीपर व मार्गदर्शक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बँकिंग व्यवहारांविषयी जागरूकता निर्माण होऊन त्यांना भविष्यातील आर्थिक व्यवहारांसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या उपक्रमासाठी जळगाव जनता सहकारी बँकेचे अमळनेर शाखेचे मॅनेजर श्री महेश गर्गे व मिल के चलो असोसिएशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री अनिरुद्ध पाटील यांनी विशेष पुढाकार घेत विद्यार्थ्यांना ही ज्ञानपर्वणी उपलब्ध करून दिली. या सत्रात अमळनेर येथील दौ. रा. कन्या शाळेच्या इयत्ता आठवीतील १२० विद्यार्थिनी तसेच पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता नववीतील ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात जळगाव जनता सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतील आयटी विभागाचे श्री योगेश चोपडे यांनी डिजिटल बँकिंग, सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक, तसेच बँकिंग व्यवहार करताना घ्यावयाची काळजी व जोखीम याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य व सुरक्षित वापर कसा करावा, याबाबत त्यांनी उदाहरणांसह माहिती दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली.
यावेळी अमळनेर शाखेचे मॅनेजर श्री महेश गर्गे यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पटवून देत, बचत, शिस्तबद्ध आर्थिक नियोजन व बँकिंग व्यवहारांची माहिती लहान वयातच आत्मसात करणे किती आवश्यक आहे, यावर भर दिला. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकेत नेऊन बँकेतील व्यवहार, खाते उघडणे, कॅश काऊंटर, डिजिटल सेवा यांची प्रत्यक्ष माहिती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
मिल के चलो असोसिएशनतर्फे श्री विनायक पाटील, श्री अतुल सैंदाणे व श्री विवेक सूर्यवंशी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. दौ. रा. कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी तसेच पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल श्री देवरे सर यांनी या उपक्रमाला मान्यता देत रोटरी क्लब हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला. तसेच उपक्रमशील शिक्षक श्री दिनेश पालवे सर यांनी कार्यक्रमास मान्यता मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीबीए शाळेचे शिक्षक श्री वंजारी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिल के चलो असोसिएशनचे श्री विनायक पाटील सर यांनी मानले. विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही शाळांतील शिक्षकवृंद तसेच कार्यक्रमस्थळी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांची मूलभूत माहिती मिळून त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली असून, भविष्यातील आर्थिक निर्णय अधिक सजगपणे घेण्यास हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *