शिक्षक ते नॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील यांची जिद्दीची ४२ किलोमीटरची झेप!
![]()
शिक्षक ते नॅशनल रनर : अँड. चंद्रभान पाटील यांची जिद्दीची ४२ किलोमीटरची झेप!
अमळनेर प्रतिनिधी
शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजघडवणारा व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेल्या अँड. चंद्रभान पाटील यांनी आता क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. १०८ किलो वजनातून थेट नॅशनल रनरपर्यंतचा प्रवास हा केवळ धावण्याचा नाही, तर तो जिद्द, चिकाटी, सातत्य आणि स्वप्नपूर्तीचा जिवंत दस्तऐवज ठरत आहे.
संचालक – शिखर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व शिखर अभ्यासिका, अमळनेर असलेल्या अँड. चंद्रभान पाटील यांनी मागील वर्षी एक स्वप्न पाहिले आणि अवघ्या एका वर्षात ते वास्तवात उतरवले. प्रारंभी १०८ किलो वजन असताना केवळ जॉगिंगपासून सुरुवात करत त्यांनी धावण्याकडे वाटचाल केली. कठोर मेहनत आणि काटेकोर नियोजनाच्या जोरावर फक्त ४ महिन्यांत तब्बल २८ किलो वजन घटवून त्यांनी स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत केले.
यानंतर सुरू झाला स्वप्नांच्या पाठलागाचा खडतर प्रवास. मागील ८ महिन्यांत त्यांनी २१ किलोमीटरच्या तब्बल ६ हाफ मॅरेथॉन स्पर्धा दोन तासांच्या आत पूर्ण करत आपल्या क्षमतेचा ठसा उमटवला.
२८ डिसेंबर रोजी जळगाव येथे पार पडलेल्या ‘खान्देश रन मॅरेथॉन’मध्ये त्यांनी २१ किमी अंतर अवघ्या १ तास ४३ मिनिटांत पूर्ण करून स्वतःचाच पूर्वीचा विक्रम मोडला.
या यशाचा कळस ठरला ११ जानेवारी रोजी नाशिक येथे झालेल्या प्रतिष्ठित MVP मॅरेथॉनमध्ये त्यांनी प्रथमच ४२ किलोमीटरचे अंतर अवघ्या ३ तास ५५ मिनिटांत पूर्ण करून नवा इतिहास रचला.
४२ किमी अंतर ४ तासांच्या आत पूर्ण करणे हे धावपटूंमध्ये मोठे आव्हान मानले जाते. मात्र अँड. पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात हे आव्हान पेलून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव मिळवला आहे.
येथूनही हा प्रवास थांबणारा नाही. २२ फेब्रुवारी रोजी लोणावळा येथे होणाऱ्या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ५० किलोमीटर अंतर पार करून ‘अल्ट्रा रनर’ होण्याचा मान मिळवण्याच्या दिशेने त्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, या यशामागे गेल्या एका वर्षात २५०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर धावण्याचा कसून सराव आहे.
अँड. चंद्रभान पाटील यांचा हा प्रवास एक स्पष्ट संदेश देतो —
“प्रयत्नांती परमेश्वर”.
अशक्य वाटणारी उद्दिष्टेही कठोर मेहनत, सातत्य, जिद्द, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या बळावर शक्य होतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे.
२०२६ च्या अखेरपर्यंत इंटरनॅशनल रनर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अँड. चंद्रभान पाटील धावत आहेत — केवळ ट्रॅकवरच नव्हे, तर असंख्य युवकांच्या मनात प्रेरणेची ज्योत पेटवत!

